जेआरडी टाटा यांच्या जीवनातील बहुतेक किस्से अनेकांना माहित आहेत. मात्र आज तुम्हाला आम्ही त्यांचा एक असा किस्सा सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्यक्तीची ओळख त्याच्या पैशांनी नाही तर त्याच्या विनम्रतेने होते, हे या घटनेतून स्पष्ट होतं. अभिनेते दिलीप कुमार आणि जेआरडी टाटा यांच्या भेटीदरम्यानचा हा किस्सा आहे. त्यावेळी दिलीप कुमार आघाडीचे अभिनेते होते आणि टाटा प्रसिद्ध व्यावसायिक. दोघांची पहिली आणि शेवटची भेट विमानात झाली.

बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये त्यावेळी दिलीप कुमार यांचं नाव घेतलं जायचं. ते एकदा विमानाने प्रवास करत होते. विमानातील इतर प्रवासी त्यांना पाहून अक्षरश: वेडेच झाले होते. काही जण त्यांच्याशी बोलण्यासाठी पुढे आले आणि त्यांचा ऑटोग्राफही घेतला. मात्र त्यांच्या बाजूला बसलेल्या एका व्यक्तीला या सर्व गोष्टींनी काहीच फरक पडत नव्हता. ती व्यक्ती शांतपणे बसून मासिक वाचण्यात व्यस्त झाली होती. ही व्यक्ती इतर कोणी नसून प्रसिद्ध व्यावसायिक जेआरडी टाटा होते. खरंतर दिलीप कुमार आणि टाटा हे दोघंही एकमेकांना ओळखूच शकले नव्हते.

दिलीप कुमार यांनाही या गोष्टीचं नवल वाटलं. विमानातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्याशी बोलायला, ऑटोग्राफ घ्यायला येत होता, मात्र त्यांच्या बाजूलाच बसलेल्या व्यक्तीला या सर्व गोष्टींचा काहीच फरक पडत नव्हता. त्यांना वाटले की त्या व्यक्तीशी आपण बोलावं, पण काय बोलावं हेच दिलीप कुमार यांना सुचत नव्हतं. इतक्यातच टाटा यांनी दिलीप यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना हॅलो म्हणाले. मग दिलीप कुमारही बोलू लागले. बोलता बोलता टाटा यांना त्यांनी एक प्रश्न विचारला की, तुम्ही सिनेमे पाहता का? टाटा यांनी उत्तर दिलं की खूप क्वचित पाहतो, वर्षभरापूर्वी एक सिनेमा पाहिला होता. तेव्हा दिलीप कुमार यांनी सांगितलं की ते सिनेमांमध्ये काम करतात. यावर टाटा यांनी विचारलं की, ‘खूप छान, सिनेमात नेमकं काय करता तुम्ही?’ टाटा यांच्या प्रश्नाने जराही आश्चर्यचकित न होता ‘मी एक अभिनेता आहे’ असं उत्तर दिलं. अशा प्रकारे दोन दिग्गजांमध्ये विमान प्रवासादरम्यान चर्चा सुरु होती.