अभिनेत्री कंगना राणावतचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘मणिकर्णिका’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती झाशीच्या राणीची भूमिका साकारतेय. दिग्दर्शकाची भूमिकाही तिने या निमित्ताने पेलली आहे. ऐतिहासिक भूमिका समर्थपणे निभावल्याचं समाधान सध्या कंगनाच्या चेहऱ्यावर झळकतंय. पण चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख ‘ठाकरे’ चित्रपटाबरोबर आल्याने समाधानाच्या एका बाजूला काहीशी चिंतेची किनारही आहे. अर्थात, हार मानेल ती कंगना कसली. ती अतिशय निडर अभिनेत्री आहे. बोलण्यात अगदी आरपार काही ठेवत नाही. त्यामुळे सध्या दोन चित्रपटांच्या एकत्रित प्रदर्शनाविषयी कोणी विचारलं तर ती लगेच शब्दांची समशेर बाहेर काढते.

नुकत्याच झालेल्या ‘मणिकर्णिका’ च्या संगीत प्रकाशन सोहळ्यात कंगनाला हा प्रश्न विचारला गेलाच आणि तिने जणू काही वाटच बघत असल्यासारखं ताडकन उत्तर दिलं. माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. मला तारीख पुढे घ्या, अशी कोणी विचारणाही केलेली नाही. मी स्वतहून तारीख पुढे मागे करण्याचा तर सवालच येत नाही, असं एका दमात परखड उत्तरही तिने दिलं. पण त्यामुळे तिला आलेला राग काही लपला नाही. कारण दुसऱ्याच क्षणी चला.. प्रश्नोत्तरांचा सिलसिला इथेच थांबवू म्हणून तिने बोलणे आटोपतेही घेतले.

देशभक्तीने धगधगत्या ज्वालेसारखी वीरश्री संचारलेली राणीची भूमिका निभावताना कंगना स्वत:ही त्याच रुबाबात वावरते आहे. त्यामुळे एकीकडे देशप्रेमाविषयीसुद्धा ती सातत्याने बोलताना दिसते. या सोहळ्यात बोलताना गीतकार-लेखक प्रसून जोशींनी ‘विजयी भव’ या गाण्यातून आपली देशभक्ती व्यक्त केली आहे. तसंच प्रत्येकाला आपल्या देशाप्रति प्रेम असेल तर ते दाखवलंही पाहिजे. देशप्रेम मनात असेल तर ते तुमच्या वागण्या-बोलण्यातून, डोळ्यातून, कृतीतून इतरांना जाणवतंच. लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं यासाठी मी किती देशप्रेमी आहे, हे दाखवू नका तर मनापासून दाखवा तुम्हाला देश किती महत्त्वाचा वाटतो. देशप्रेम असूनसुद्धा ते उघडपणे न सांगणेही चुकीचे आहे. देशप्रेम हे नम्र भावनेने जाणवू द्या, अशा शब्दांत तिने आपल्या भावना घडाघडा व्यक्त केल्या.

कंगना राणावतने ‘क्वीन’ चित्रपटात राणी नावाची भूमिका केली होती. आणि आता तर काय ती साक्षात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारतेय म्हटल्यावर वीरश्री आणि राणीचा रुबाब तिच्यात अगदी संचारला आहे. त्यामुळे तिला प्रश्न विचारताना सांभाळून. ‘तनु वेड्स मनू रिटर्न’ नंतर आलेले तिचे चित्रपट म्हणावे तसे यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे कंगनाला या चित्रपटाकडून अपेक्षा आहेत. त्यात प्रदर्शनाचं त्रांगडं म्हटल्यावर रागाचा पारा चढणारच. प्रत्यक्षात चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी काय होते, हे पाहणे म्हणूनच उत्सुकतेचे ठरणार आहे.