बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमानने एखादी स्टाइल केली आणि त्याची चर्चा झाली नाही असं होणारच नाही. तो कसा बसतो, कसा बोलतो, कसा चालतो, कसा राहतो यावर त्याच्या चाहत्यांचं बारकाईने लक्ष असतं. त्याचे असंख्य चाहते त्याची स्टाइल कॉपी करण्याचा अनेकदा प्रयत्न करतात. पण अभिनेत्री सलमानची पूर्वाश्रमीची प्रेयसी आणि अभिनेत्री कतरिना कैफने त्याच्या चालण्याची नक्कल करत सर्वांना थक्क केलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सध्या सलमान आणि कतरिना त्यांच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. यासाठी ते विविध देशांत फिरत आहेत आणि विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत आहेत. ‘इंडियन सुपर लीग’च्या उद्घाटन सोहळ्याला त्यांनी नुकतीच हजेरी लावली. परफॉर्म केल्यानंतर दोघांनीही स्टेडियमवर येऊन प्रेक्षकांना अभिवादन केलं. यावेळी सलमान पुढे चालत असताना कतरिनाने हळूच त्याच्या मागे त्याच्या चालण्याची नक्कल केली आणि प्रेक्षकांमध्येही एकच हशा पिकला. हा व्हिडिओ ट्विटरवरील कतरिनाच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे.

PHOTOS : विश्वसुंदरी झालेल्या भारतातील या तरुणी तुम्हाला माहित आहेत का?

‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सिक्वल असून सलमान आणि कतरिना यामध्ये पाच वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक आहेत. २२ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.