करणी सेनेचा न संपणारा विरोध आणि देशभरात निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणात संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाच्या बाजूने कौल देत भन्साळींच्या ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रोजेक्टला डोक्यावर उचलून धरले. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण, यातही जास्त प्रभावी ठरला तो म्हणजे अभिनेता रणवीर सिंगने साकारलेला अलाउद्दीन खिल्जी. ‘पद्मावत’च्या निमित्ताने रणवीरने पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्याने स्वत:मध्ये केलेले बदल पाहता हे नेमके कसे शक्य झाले याचा खुलासा खुद्द रणवीरनेच एका मुलाखतीत केला.

अनुपमा चोप्रा यांच्या ‘फिल्म कंपॅनियन’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. गेल्या वर्षी ‘पद्मावत’च्या चित्रीकरणादरम्यान, चित्रपटाच्या सेटवर मोठ्या प्रणाणात तोडफोड करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर त्यावेळी भन्साळींवरही करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. ती सर्व परिस्थिती पाहून आपल्या तळपायाची आग मस्तकात गेली होती, असे रणवीरने या मुलाखतीत सांगितले.

त्यावेळी आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान असणाऱ्या व्यक्तीचा असा अपमान होणे, ज्या जागेची आपण देवाप्रमाणे पुजा करतो अशा चित्रपटाच्या सेटचे नुकसान होणे, तिथे तोडफोड केली जाणे हे सर्व पाहून मला प्रचंड चीड आली होती, असे त्याने स्पष्ट केले. त्याविषयी अधिक माहिती देत रणवीर म्हणाला, ‘मी तुम्हाला नाही सांगू शकत की त्यावेळी मला किती राग आला होता. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी मला शांत केले. नाहीतर माझा राग आटोक्यात आणणे तसे कठीणच होते. जे ठिकाण मला पूजनीय आहे, ज्या ठिकाणाला मी देव मानतो, तेथे ते असं कसं करु शकतात, त्यांची हिंमतच कशी होते असे करण्याची असेच प्रश्न माझ्या मनात घर करत होते. पण, शेवटी मी या गोष्टींवर व्यक्त न होण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या अभिनयातून व्यक्त होण्याचा मार्ग निवडला.’

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

आपल्या या भूमिकेविषयी आणखी माहिती देत रणवीर म्हणाला, ‘खिल्जी साकारताना त्या भूमिकेच्या माध्यमातून माझ्यातील संतापाला वा मोकळी करुन देणे हा एक उत्तम पर्याय होता आणि मी तो निवडला. आता चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा खिल्जीच्या रुपात मी प्रेक्षकांच्या भेटीला आलो. पण, तुमच्यामध्ये होणाऱ्या बदलाला काही गोष्टी कारणीभूत असतात हे मात्र मला कळून चुकले. त्यावेळी झालेल्या प्रसंगामुळे माझ्यातही काही बदल झाले आणि मी ते एका वेगळ्या माध्यमातून व्यक्त केले’, असे रणवीर म्हणला. सध्याच्या घडीला ‘पद्मावत’ चित्रपटाला फक्त प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला असून दीपिका, शाहिद आणि रणवीरच्या अभिनयाचीही अनेकांनी प्रशंसा केली आहे. पण, या साऱ्यामध्ये नकारात्मक भूमिका साकारणारा रणवीर उजवा ठरला हेच खरे.