01 March 2021

News Flash

बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लोक अक्षरश: माझ्या पाया पडायला यायचे- देवदत्त नागे

'सत्यमेव जयते' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा रंजक किस्सा देवदत्तनं सांगितला आहे.

देवदत्त नागे

जय मल्हार या मालिकेत खंडोबाची व्यक्तिरेखा साकारत अभिनेता देवदत्त नागे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. हा मराठमोळा अभिनेता आता बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करत आहे. जॉन अब्राहमच्या आगामी ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात तो भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे, तो यामध्ये खलनायकाच्या भूमिकेत झळकणार असून ट्रेलरमध्ये त्याची एक झलकसुद्धा पाहायला मिळाली. त्यामुळे देवदत्तच्या भूमिकेविषयी आणि बॉलिवूड पदार्पणाविषयी चाहत्यांमध्ये फारच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक रंजक किस्सा त्याने सांगितला आहे.

देवदत्तने साकारलेली खंडोबाची व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध आहे. या व्यक्तिरेखेमुळे तो घराघरात पोहोचला आणि या प्रसिद्धीची प्रचिती त्याला शूटिंगदरम्यानसुद्धा आली. यासंदर्भातील एक किस्सा त्याने सांगितला. ‘शूटिंग पाहण्यासाठी आलेले लोक चक्क सेटवर देवदत्तच्या पाया पडायचे आणि हे पाहून जॉन अब्राहम आणि दिग्दर्शक सुद्धा चक्रावून जायचे. मी साकारलेल्या खंडोबाच्या भूमिकेचा प्रभाव लोकांवर इतका आहे की ते साक्षात देवच समजून पाया पडायला यायचे. इतकंच नाही तर या चित्रपटात मी खलनायकाची भूमिका साकारत आहे आणि जॉन एका महिलेला मला कानाखाली मारण्यास सांगत असतो असं दृश्य त्यात आहे. ती महिलासुद्धा माझ्या खंडोबाच्या भूमिकेनं इतकी प्रभावित झाली होती की मला मारण्यासच तयार होत नव्हती. अखेर मी तिला समजावून सांगितलं. तू कलाकार नाही तर मी साकारणाऱ्या भूमिकेचा विचार कर आणि अभिनय कर असा सल्ला मी तिला दिला. बराच वेळ तिला समजावून सांगितल्यानंतर तो सीन करण्यास ती तयार झाली,’ असं तो म्हणाला. सहकलाकार जॉनसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत अनोखा असून आमच्या बऱ्याच आवडीनिवडी सारख्याच आहेत, असंदेखील तो म्हणतो.

देवदत्त नागेसोबतच यामध्ये अमृता खानविलकरसुद्धा झळकणार आहे. १५ ऑगस्ट रोजी ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देवदत्त नागेच्या या चित्रपटाविषयी त्याच्या चाहत्यांमध्येही फार उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 2:00 pm

Web Title: when people came to touch his feet jai malhar fame devdatta nage shares experience while working in bollywood movie satyamev jayte
Next Stories
1 अमृता पाहतेय ‘या’ चित्रपटाची आतुरतेने वाट!
2 ‘हा’ अभिनेता साकारणार सनीच्या पतीची भूमिका
3 ..म्हणून मामी-जयडीने ‘लागिर झालं जी’ ला ठोकला राम-राम!
Just Now!
X