बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत जे काही बोलते त्या गोष्टींची चर्चा तर होतेच. या सर्व गोष्टी किती गांभीर्याने घेतल्या जातात हा तर मोठा प्रश्नच आहे. राखी नेहमीच निर्भीड वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिला जे वाटते ते ती प्रसारमाध्यमांसमोर कोणालाही न घाबरता सहज बोलून जाते. यावेळीही तिने सिनेसृष्टीतील अनेक गोष्टींवर थेट भाष्य केले. एका मुलाखतीत तिने स्टार किड्सना सिनेसृष्टीत जेवढ्या संधी मिळतात तेवढ्या संधी नवोदित कलाकारांना मिळत नसल्याचे ती म्हणाली.

याच वर्षी ‘फर्स्टपोस्ट’ला दिलेल्या एका मुलाखतीत राखीने बॉलिवूडपासून ते राजकारण आणि क्रिकेट या सगळ्याच क्षेत्रांवर भाष्य केले. तिने सिनेसृष्टीत होणाऱ्या घराणेशाहीवरही टीका केली. घराणेशाहीवर भाष्य करताना राखीने आपल्या अनोख्या अंदाजाने साऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली. ‘सिनेसृष्टीत प्रत्येकजण आपल्या ओळखीच्या व्यक्तीलाच काम देतो. मला माहीत नाही हे असं का होतं, पण हे असंच होत आलं आहे.’
एवढं बोलून राखी थांबली नाही तर ती पुढे म्हणाली, ‘दिग्दर्शकाचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याला पटकन काम मिळतं. पण बाहेरुन आलेले कलाकार जोवर त्यांची हुजरेगिरी करत नाही, त्यांच्यासोबत बसून दारू पीत नाही, त्यांचे पाय दाबत नाहीत तोवर त्यांना काम मिळत नाही.’

`

कलाकारांची मुलं ही सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलेली असतात. त्यामुळे सिनेसृष्टीत काम मिळवणं त्यांच्यासाठी सहज होऊन जातं. त्यांचे कोणत्याही प्रकारचे ऑडिशन होत नाही. पण माझ्यासारखे जे रांगेत उभे राहून ऑडिशन देऊन पुढे आले आहेत त्यांनी कुठे जायचं?