अभिनेता रणदीप हुडा आजवर सार्वजनिक कार्यक्रमात संतापलेला किंवा कोणत्याही वादात सापडलेला आपण पाहिलेलं नाही. पण यावेळी चक्क एका पत्रकारपरिषदेत रणदीप हुडाला आपला राग आवरता आला नाही. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर रणदीपने संताप व्यक्त केला.
रणदीप हुडा प्रमुख भुमिकेत असलेल्या ‘सरबजित’ चित्रपटाच्या प्रमिअरवेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा प्रसंग घडला. चित्रपटात ‘सरबजित’च्या बहिणीची भूमिका ऐश्वर्याने साकारली आहे. तुझ्यापेक्षा ऐश्वर्याची भूमिका सरस ठरली आहे असं तुला वाटतं का? असा प्रश्न रणदीपला विचारण्यात आला होता. त्यावर संतापलेल्या रणदीपने पत्रकाराला ‘तू गप्प बस’ असे उत्तर दिले. त्यानंतर रणदीपने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारण्यात आल्यानंतर रणदीप आणखी नाराज झाला आणि मला या विषयावर काहीच बोलायचे नाही, असे म्हटले. तूम्ही मला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारणार असाल तर मी दुर्लक्षच करत राहीन, मला या प्रश्नावर काहीच बोलायचे नाही, असे तो पुढे म्हणाला.
दरम्यान, ‘सरबजित’च्या प्रिमिअरला अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, रणदीप हुडा, रिचा चड्डा यांच्यासह महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक आणि ऐश्वर्याचे कुटुंबिय उपस्थित होते.