अभिनेता सलमान खानचे वडील व लेखक सलीम खान हे आज त्यांचा ८५वा वाढदिवस साजरा करत आहेत. सलमानने अनेक मुलाखतींमध्ये वडिलांबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. सलमानच्या बालपणीचा एक किस्सा त्याने एका टिव्ही शोमध्ये सांगितला होता. जेव्हा सलीम खान सलमानच्या शाळेची फी भरू शकले नव्हते, तेव्हा त्याला वर्गाबाहेर उभं केलं होतं. मात्र आपली शिक्षा मुलाला का मिळावी असा प्रश्न उपस्थित करत सलीम खान स्वत: सलमानसाठी वर्गाबाहेर उभे राहिले होते.

कामावरून घरी जात असताना सलीम खान यांनी सलमानला वर्गाबाहेर उभं असल्याचं पाहिलं. त्यामागचं कारण त्यांनी सलमानला विचारलं, तेव्हा त्याने फी न भरल्यामुळे वर्गाबाहेर काढल्याचं सांगितलं. त्यावेळी सलमान चौथीत शिकत होता.

आणखी वाचा : ”मालदीव व्हेकेशन’चे फोटो पोस्ट करणारे सेलिब्रिटी खरंच मूर्ख’; अभिनेत्याने सुनावलं

सलमानला दिलेली शिक्षा पाहून सलीम खान मुख्याध्यापकांच्या कार्यालयात गेले. शाळेची फी न भरल्याने सलमानला वर्गाबाहेर उभं राहण्याची शिक्षा केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर सलीम खान मुख्याध्यापकांना म्हणाले, “सलमान शाळेची फी भरणार नव्हता, त्यामुळे त्याला वर्गाबाहेर काढणं योग्य नाही.” सलीम खान यांनी मुख्याध्यापकांकडे फी भरली आणि सलमानला वर्गात बसण्यास सांगितलं. नंतर त्याच्या जागी सलीम खान वर्गाबाहेर उभे राहिले होते.