‘दबंग’ खान अर्थात सलमानला बॉलिवूडचा सुपरस्टार म्हटलं जातं. प्रसिद्धीसोबतच सलमानने पैसासुद्धा फार कमावला आहे. मात्र एकेकाळी त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती. एकदा सलमानने वडील सलीम खान यांचा पगारच जाळला होता. मात्र त्यावेळी सलीम खान यांची जी शिकवण दिली ती त्याला आयुष्यभर लक्षात राहिली. संजुक्ता नंदी यांच्या ‘खान्टॅस्टिक’ या पुस्तकात या प्रसंगाचा उल्लेख आहे.

सलमानचा जन्म मध्यप्रदेशमधील इंदूर येथे झाला आणि त्याचं लहानपणसुद्धा तिथेच गेलं. एकदा दिवाळीला सलमान त्याच्या भावंडांसोबत मिळून काही पेपर्स जाळत होता. हातातले पेपर्स संपल्यानंतर सलमान वडिलांच्या स्टडी टेबलजवळ गेला आणि तिथून पेपरचा गठ्ठा उचलला. भावंडांसोबत मिळून सलमानने तो गठ्ठाच जाळला आणि नंतर त्याला समजलं की त्या पेपरच्या गठ्ठ्यात सलीम खान यांच्या पगाराचे ७५० रुपये होते.

आणखी वाचा : ‘आम्हाला तुमचा अभिमान आहे’; पाकिस्तानने केली भारतीयांची प्रशंसा

सलीम खान यांना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवलं. मुलांना ओरडण्याऐवजी त्यांनी पैशांचं महत्त्व त्यांना समजावून सांगितलं. त्या संपूर्ण पैशांमध्ये कुटुंबीयांच्या जेवणाची व्यवस्था झाली असती, असं त्यांनी सलमानला सांगितलं. या गोष्टीचा सलमानच्या मनावर खूप प्रभाव पडला आणि तेव्हापासून तो पैशांचं मोल समजू लागला.

आता गरजूंसाठी सलमान सढळ हाताने मदत करतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा केली असताना सलमानने रोजंदारी कामगारांना आर्थिक मदत केली.