23 February 2019

News Flash

..म्हणून भाईजानला स्टेशनवरच काढावी लागली रात्र

मात्र हे खरं असून सलमानने स्वत:च त्याचा हा अनुभव शेअर केला आहे.

सलमान खान

मुंबईच्या लाईफलाईनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. या रोजच्या प्रवासात त्यांना रोज नवनवीन अनुभवही येत असतात. त्यामुळे अनेक वेळा गर्दीमुळे लोकल सुटणे हे सर्वसामान्य प्रवाशांसाठी सवयीची गोष्ट झाली आहे. मात्र मुंबईच्या याच रेल्वेचा अनुभव अभिनेता सलमान खाननेही घेतला आहे असं सांगितलं तर कोणालाही खरं वाटणार नाही. मात्र हे खरं असून सलमानने स्वत: त्याचा हा अनुभव शेअर केला आहे.

बॉलिवूडमध्ये यशस्वी चित्रपट देणाऱ्या सलमानने चक्क एक रात्र रेल्वे स्टेशनवर झोपून काढली होती. त्याचा हा अनुभव त्याने नुकताच शेअर केला असून ट्रनने प्रवास करताना किती सतर्क रहायला लागतं हेही त्याने सांगितलं.  कॉलेज जीवनामध्ये एकदा एका मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या सलमानची शेवटी लोकलही सुटली होती आणि यामुळे त्याला स्टेशनवर झोपावे लागले होते.

‘एकदा माझ्या मित्राला भेटण्यासाठी मी गेलो होतो आणि परत यायला उशीर झाल्यामुळे माझी शेवटची लोकलही सुटली. ही ट्रेन सुटल्यामुळे मला घरी जाण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता त्यामुळे मी स्टेशनवर झोपण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मी इतका थकलो होतो की जेव्हा पहिली गाडी आली ती गाडी चर्चगेट असल्याचं समजून त्याच गाडीत चढलो आणि ती गाडी विरारची असल्यामुळे मी थेट विरारला पोहोचलो. मात्र हा अनुभव फारच मजेशीर होता’, असं तो म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, या प्रवासावरुन मी एक नक्कीच शिकलो की ट्रेनने प्रवास करताना कायम सतर्क असलं पाहिजे. एक जरी गाडी चुकली तरी किती समस्या उद्भवतात हे चांगलंच माझ्या लक्षात आलं आहे. दरम्यान, सलमान खानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरु होणार असून या चित्रपटामध्ये ‘क्वांटिको गर्ल’ प्रियांका चोप्रादेखील झळकणार आहे.

First Published on July 12, 2018 10:46 am

Web Title: when salman khan spend whole night at station