बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमी मजेशीर अंदाजात चाहत्यांना उत्तर देताना दिसतो. २००५ मध्ये त्याने बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोच्या पहिल्या सिझनमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत हजेरी लावली होती. त्यावेळी शाहरुख त्याच्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आला होता आणि अमिताभ हे ‘ब्लॅक’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते. त्या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला होता.

‘कॉपी विथ करण’ या शोमध्ये करणने शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. दरम्यान रॅपिड फायर राऊंडमध्ये करणने अमिताभ यांना प्रश्न विचारला होता की त्यांच्याकडे अशी कोणती गोष्ट आहे जी शाहरुखकडे नाही. त्यावर उत्तर देत बिग बी म्हणाले, ‘माझी उंची.’

त्यानंतर शाहरुखला देखील काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्याला देखील तुझ्याकडे अशी कोणती गोष्ट आहे जी अमिताभ यांच्याकडे नाही असा प्रश्न करणने विचारला. त्यावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने सर्वांना हसू अनावर झाले. ‘माझ्याकडे जे आहे ते अमिताभ यांच्याकडे नाही ते म्हणजे, उंच पत्नी’ असे शाहरुखने उत्तर देत म्हणताच सर्वांना हसू अनावर झाले. दरम्यान शाहरुखने ‘कौन बनेगा करोडपती’ हा अमिताभ बच्चन यांचा शो होस्ट करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.