मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर राज कुंद्रा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये शिल्पा शेट्टीने राज आणि तिची भेट कशी झाली हे सांगितले होते.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिल्पा शेट्टीने उद्योगपती राज कुंद्राशी पहिली भेट कॉमन मित्रांमुळे झाल्याचे सांगितले होते. एका बिझनेस डिलसाठी राज आणि शिल्पा भेटले होते. ती त्यांची पहिली भेट होती. पहिल्याच भेटीत शिल्पाला राज आवडू लागला होता. पण राजचे लग्न झाले आहे हे कळाल्यानंतर शिल्पा नाराज झाली. त्यानंतर काही दिवसांनंतर राज आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला.

आणखी वाचा : ‘अ‍ॅपसाठी त्याने मला…’, राज कुंद्राच्या अटेकनंतर यूट्यूबरचा गौप्यस्फोट

काही दिवसांनंतर शिल्पाला राजच्या घटस्फोटाविषयी कळाले. त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. हळूहळू राज महागडे गिफ्ट्स देऊन शिल्पाला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत होता. एकदा तर राजने एकाच स्टाइलच्या पण वेगवेगळ्या रंगाच्या तिन बॅग शिल्पाला गिफ्ट म्हणून पाठवल्या होत्या. ते पाहून शिल्पाला आश्चर्य वाटले होते. त्यावेळी राज लंडनमध्ये राहत होता आणि शिल्पाला कधीही लंडनमध्ये शिफ्ट व्हायचे नव्हते. शिल्पामुळे राजने मुंबईमध्ये घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात होते. त्याच्या काही वर्षांनंतर शिल्पा आणि राजने लग्न केले.

राज कुंद्राला अटक झालेले प्रकरण काय आहे?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. सोमवारी या प्रकरणात राज कुंद्राचे नाव समोर आल्यानंतर त्याला अटक झाली आहे. राज कुंद्रा आणि इतर एक आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.