मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस. सोनालीने चित्रपटात ज्याप्रकारे दमदार भूमिका साकारल्या, त्याचप्रकारे ती खऱ्या आयुष्यातही परखड मतं मांडण्यात मागे हटली नाही. सोनाली सोशल मीडियाद्वारे विविध मुद्द्यांवर व्यक्त होतच असते. काही दिवसांपूर्वी तिने स्वत:चा विनामेकअप लूकमधला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोसोबतच तिने तिचा नैराश्याचा अनुभवसुद्धा चाहत्यांना मोकळेपणाने सांगितला.

काय होती सोनालीची पोस्ट?

‘ही मी आहे. तुमची ऑनस्क्रीन अप्सरा नाही. तरीसुद्धा मी स्वत:वर खूप प्रेम करते. माझी त्वचा जन्मत:च नितळ होती. मात्र नटरंग या चित्रपटानंतर मला पिंपल्सचा त्रास जाणवू लागला. अनेक मुलींना हा त्रास जाणवतो. त्यामुळे मी बरेच ऑफर्ससुद्धा गमावले. मी नैराश्याच्या गर्तेत अडकले होते. पण जेव्हा तुम्ही स्वत:ला जसे आहात तसे स्वीकारता, तेव्हा या समस्या तुम्हाला फार त्रास देत नाहीत. तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर ठीक आहे. ते नाही लपवले तरी ठीक आहे. फक्त स्वत:वर प्रेम करायला शिका.’

आणखी वाचा : “राजकीय नेत्याशी माझं लग्न झालेलं नाही”; लग्नाच्या अफवांवर सोनालीचं स्पष्टीकरण

चित्रपटसृष्टीत वावरणारे कलाकार अनेकदा विनामेकअप लूक सोशल मीडियावर पोस्ट करताना घाबरतात. चाहत्यांच्या प्रतिक्रिया काय असतील, याचा विचार अनेकजण करतात. मात्र या गोष्टींना न जुमानता सोनालीने सकारात्मकपणे तिचा अनुभव सांगितला आणि चाहत्यांनाही ‘तुम्ही जसे आहात तसे स्वत:ला स्वीकारा’ हा मोलाचा संदेश दिला.