कलाविश्वातील स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात वाचा फोडणाऱ्या ‘मी टू’ #MeToo या मोहिमेने बॉलिवूड ढवळले. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पत्रकार राजीव मसंद यांनी बॉलिवूडच्या काही नामवंत अभिनेत्रींना निमंत्रित केलं. पण या चर्चेदरम्यान अभिनेत्री राणी मुखर्जीने ‘मी टू’ मोहिमेसंदर्भात असं काही मत मांडलं की त्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होण्याची वेळ तिच्यावर आली. राणीच्या मतावर अभिनेत्री दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट यांनीसुद्धा आक्षेप घेतला.

‘तरुणींनी, महिलांनी स्वत:च्या रक्षणासाठी मार्शल आर्ट्स शिकलं पाहिजे. यांसारख्या गोष्टींचा शाळेच्या अभ्यासक्रमातही समावेश करावा. स्वसंरक्षणासाठी महिलांनी समर्थ असलं पाहिजे,’ असं मत राणीने मांडलं. त्यावर आक्षेप घेत दीपिका म्हणाली, ‘तरुणींसाठी, महिलांसाठीचं वातावरण इतकं सुरक्षित हवं की त्यांना स्वसंरक्षणासारख्या गोष्टी शिकण्याची गरज भासू नये. या गोष्टी शिकल्याच पाहिजेत पण त्यापूर्वी लोकांची मानसिकता बदलली पाहिजे.’ दीपिकाच्या या मताशी अनुष्का आणि आलियासुद्धा सहमत झाल्या. या चर्चेदरम्यानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी राणीवर निशाणा साधला.
नेटकऱ्यांनी दीपिकाच्या मताशी सहमती दर्शवत राणीला विरोध केला. मार्शल आर्ट्स किंवा स्वसंरक्षणासाठी आवश्यक त्या गोष्टी शिकायला पाहिजेत पण त्याने प्रश्न सुटणार नाही अशी टीका नेटकऱ्यांनी राणीवर केली.

२०१८ हे वर्ष खऱ्या अर्थाने बॉलिवूडसाठी धडा शिकवणारं ठरलं आहे. कारण या वर्षी मनोरंजन सृष्टीने चित्रपटांबरोबरच समाजामध्ये होणाऱ्या महिलांच्या शोषणांसंदर्भातील विषयाचा वाचा फोडली. चित्रपट सृष्टीमधून सुरू झालेले मी टूचे हे वादळ नंतर अनेक क्षेत्रांमध्ये आले. अगदी प्रसारमाध्यमे, शैक्षणिक संस्था, क्रीडा, राजकारण या सर्वच क्षेत्रांमधील स्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला मी टू च्या माध्यमातून वाचा फोडली. या मोहिमेमुळे केवळ कास्टिंग काऊचच्या नावाखाली होणाऱ्या चर्चाचे गंभीर स्वरूप जागासमोर आले.