रणवीर सिंग आणि रणबीर कपूर हे दोघं बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार मात्र या दोघांनी आतापर्यंत एकाही चित्रपटात स्क्रीन शेअर केलेली नाही. मात्र तरीदेखील या दोघांच्या सतत चर्चा रंगत असतात. त्यामागचं कारणही खास आहे. रणवीर सिंगची पत्नी असलेली दीपिका पदुकोण कधीकाळी रणबीर कपूरला डेट करत होती. त्यामुळे या तिघांची जोडी सतत चर्चेत येत असते. रणबीर आणि दीपिका यांचा ब्रेकअप झाल्यानंतरही ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र असून रणवीरला त्यांच्या मैत्रीविषयी कोणतीच तक्रार नाही. उलटपक्षी तोदेखील रणबीरचा चांगला मित्र आहे. त्यांच्या या मैत्रीचा नुकताच फिल्मफेअर पुरस्कार २०१९ मध्ये प्रत्यय आला. या सोहळ्यातील एक फोटो दीपिकाने शेअर करत माझ्या आयुष्यातील आवडती माणसं एकाच फ्रेममध्ये असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे सध्या या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे.

कलाकार कायम आपल्या कामातून कलाविश्वासाठी त्यांचं खास योगदान देत असतात. त्यांच्या या कामाची पोचपावती त्यांना पुरस्कार रुपात मिळत असते. त्यासाठी कलाविश्वामध्ये अनेक पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करण्यात येत असतं. मात्र या साऱ्यांमध्ये फिल्मफेअर पुरस्कार हा मानाचा समजला जातो. या सोहळ्याला कलाविश्वातील दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते. यंदाचा २०१९ चा फिल्मफेअर पुरस्कार नुकताच पार पडला. या सोहळ्यामध्ये रणबीर, दीपिका आणि रणवीर यांची विशेष चर्चा झाली.

फिल्मफेअर पुरस्कारातील एक फोटो दीपिकाने तिच्या इन्स्टास्टोरीमध्ये ठेवला असून या फोटोतमध्ये अभिनेता विकी कौशलसोबत रणबीर आणि रणवीर दिसून येत आहेत. हा फोटो शेअर करत “माझ्या जीवनातील महत्वाची आणि माझी आवडती माणसं एकाच फ्रेममध्ये”, असं दीपिकाने म्हटलं आहे. विशेष म्हणजे या फोटोपेक्षा तिच्या कॅप्शनचीच सर्वाधिक चर्चा रंगली आहे. या फ्रेममध्ये रणवीर आणि रणबीर दोघंही एकत्र दिसत असल्यामुळे दीपिकाचा नक्की आवडता व्यक्ती कोण असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

दरम्यान, दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगशी लग्न केलं असून रणबीर कपूर तिचा भूतकाळ आहे. मात्र ब्रेकअपनंतरही त्यांच्यातील मैत्री टिकून आहे. इतकंच नाही तर त्यांच्या मैत्रीवर रणवीरलाही कोणताच आक्षेप नाही. ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका आणि रणबीरने ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘तमाशा’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.