‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेंना २१ जून रोजी अटक करण्यात आली होती. बिचकुलनेंना चेक बाऊन्स केल्या प्रकरणी सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीने बिग बॉसच्या घरातूनच अटक केली. या प्रकरणाची तक्रार करणारे वकील संदीप सकपाळ यांनी हे संपूर्ण प्रकरण काय आहे याचा खुलासा केला आहे.

टीव्ही 9 मराठीसह बोलताना संदीप यांनी अभिजीत बिचुकलेंनी नेमके काय केले आहे याचा खुलासा केला आहे. अभिजीत गेल्या ७-८ वर्षांपासून संदीप यांचा साताऱ्यातील फ्लॅट वापरत होते. संदीप आणि अभिजीत या दोघांमध्ये चांगले संबंध असल्यामुळे २०१५ मध्ये खासगी कामासाठी संदीप यांनी अभिजीतला ५० हजार रुपयांची मदत केली होती. परंतु संदीप यांनी पैसे पुन्हा मागताच अभिजीतने त्याच्या सवयी प्रमाणे फोन नंबर बदलला. त्यानंतर काही दिवसानंतर अभिजीत यांनी २८ हजार रुपयांचा चेक संदीप यांना दिला होता. पण तो चेक बाऊन्स झाला. संदीप यांनी लागलीच अभिजीत यांच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. केसही दाखल केली. परंतु न्यायाधीशांसमोर गयावया करत अभिजीत यांना जामीन मिळाला असल्याचे संदीप यांनी सांगितले.

अभिजीत त्यानंतर तब्बल अडीच वर्षे फरार होते. परंतु ते बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाल्याचे कळताच संदीप यांनी त्याला कोर्टात अटक करण्यासाठी अर्ज केला. त्यामुळे कोर्टाने अभिजीत यांच्या विरोधात अटक वॉरेंट जारी केले आणि बिग बॉसच्या घरातून अभिजीत यांना सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईनंतर अभिजीत बिचुकले स्पर्धेत कायम राहणार? की त्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास इथेच संपणार? यासारखे अनेक प्रश्न चाहत्यांना भेडसावत आहेत.