भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट ऑस्करला पाठवला पाहिजे अशी इच्छा यापूर्वी अनुपम यांची पत्नी किरण खेर यांनी व्यक्त केली होती. हिच इच्छा अनुपम खेर यांनी देखील व्यक्त केली आहे. आपण किती वर्ष ऑस्करच्या शर्यतीत फक्त भारताचं दारिद्र्य विकत राहणार आहोत? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर हा चित्रपट आजच्या भारतातील राजकारणावर भाष्य करणारा आहे. हा चित्रपट ऑस्करसाठी जरूर पाठवला पाहिजे. किती काळ आपण भारतातील दारिद्र्य, दोन वर्गातील तफावत यांच्यावर आधारलेले चित्रपट विकणार आहोत? किती काळ आपण हत्ती, माकडांवर आधारलेले चित्रपट विकणार आहोत? आपण आता वेगळ्या विषयांवर चित्रपट ऑस्करसाठी पाठवायला सुरुवात केली पाहिजे आणि हा चित्रपट तसाच आहे ‘ असं मत अनुपम खेर यांनी स्पॉट बॉय इला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.

काही दिवसांपूर्वी अनुपम खेर यांच्या पत्नी भाजपाच्या खासदार किरण खेर यांनी देखील ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ ऑस्करला पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चाकोरीबाहेरचा चित्रपट आहे. राहुल गांधीसारखे व्यक्ती जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य करतात त्यांनी आपला विचार कृतीत उतरवून दाखवावा. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक मनमोहन सिंग यांच्या प्रेमात पडतील तसेच ऑस्करसाठी भारताकडून हा चित्रपट नक्की पाठवावा असंही त्या म्हणाल्या होत्या.

मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काही काळ त्यांचे माध्यम सल्लागार असलेले संजय बारू यांनी लिहीलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला आहे.