अमिताभ बच्चन यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुजरात पर्यटन प्रचाराच्या चित्रीकरणाचे  फेरनियोजन करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून समजले. उद्यापासून (मंगळवार) चंपानेर पावगढ येथे ‘खुशबू गुजरात की’ साठीचे चित्रीकरण सुरू होणार होते. परंतु ते आता पुढे ढकलण्यात आले आहे. या विषयी वृत्तसंस्थेशी बोलताना गुजरात पर्यटन विभागाचे आधिकारी म्हणाले, काही वेळापूर्वी अमिताभ बच्चन यांचा याबाबतचा संदेश आम्हाला मिळाला असून, कार्यक्रमाचे फेरनियोजन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
या आधी, माजी केंद्रीय मंत्री आणि छोटा उदेपुर येथील काँग्रेसचे उमेदवार नारायणभाई रथ्वा यांनी निवडणूक आयोगाशी संपर्क साधून ‘खुशबू गुजरात की’ द्वारे अमिताभ बच्चन करत असलेल्या गुजरात पर्यटन प्रचाराच्या चित्रीकरणाबाबत आपला आक्षेप नोंदवला होता. नरेन्द्र मोदी आणि गुजरात सरकार बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रसिध्दीचा मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी फायदा करून घेत असल्याचा आरोप करत मागील आठवड्यात रथ्वा यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी अनिता कारवल आणि मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांना या विषयी लिहिलेल्या पत्रात रथ्वा यांनी आचार संहितेचे उल्लंघन होण्याचा आरोप केला आहे.