एकीकडे किंम जोंग उन म्हणजेच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सिंगापूरला भेट झाल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरात ही दोन्ही राष्ट्र, खासकरून उत्तर कोरिया विशेष चर्चेत आहे. किम जोंग उन यांच्याबद्दल जगाला उत्सुकता आहेच. शिवाय त्या देशाबद्दल, तिथल्या संस्कृतीबद्दल आणि लोकांबद्दलही जाणून घेण्यात अनेकांना रस आहे. उत्तर कोरियामध्ये भारताच्या राजदूतपदी मराठमोळा चेहरा सोलापूरचे अतुल गोतसुर्वे आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तिथल्या संस्कृतीविषयी आणि भारतीय चित्रपटांविषयी तिथल्या लोकांना असणाऱ्या उत्सुकतेविषयी माहिती दिली.

भारतीयांप्रमाणेच बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अमिताभ बच्चन तिथेही विशेष आहेत आणि चर्चेत असण्यामागचं कारण आहे त्यांचा चित्रपट ‘बागबान’. हा चित्रपट तिथे फार लोकप्रिय आहे. त्याचसोबत ब्लॉकबस्टर ‘दंगल’ आणि ‘बाहुबली’ हे चित्रपटसुद्धा तिथे विशेष प्रसिद्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘उत्तर कोरियातल्या लोकांना भारताबद्दल बरीच माहिती आहे. भारत जोमाने प्रगती करणारा देश आहे अशी माहिती इथल्या लोकांना आहे. विशेष म्हणजे आशियाई देश असल्याने कुटुंबव्यवस्थेकडे इथल्या लोकांचा अधिक कल आहे. अमिताभ बच्चन यांचा ‘बागबान’ चित्रपट त्यामुळे इथल्या लोकांना खूप आवडतो. त्यापाठोपाठ ‘दंगल’ आणि ‘बाहुबली’ हे चित्रपटसुद्धा इथे विशेष प्रसिद्ध आहेत. बऱ्याच भारतीय चित्रपटांच्या सीडीसुद्धा इथे उपलब्ध आहेत.’

भारतीय चित्रपटांनी परदेशांमध्ये विशेष ख्याती मिळवली असून त्यांचा बोलबोला सर्वत्र असल्याचं यातून नक्कीच स्पष्ट होत आहे.