वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. सध्या हिंदी बिग बॉसचे १३ वे पर्व सुरु आहे. या वेळी बिग बॉसच्या फॉरमॅटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. पण हे बदल चाहत्यांच्या फारसे पसंतीला उतरले नाहीत असे म्हटले जात आहे. सध्या बिग बॉसमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो लव जिहादला प्रोत्साहन देत असल्याने शो बॉयकॉट करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र आता या फोटोचे सत्य समोर आले आहे. हा फोटो या पर्वामधील नसून आधीच्या पर्वामधील आहे.
शोमध्ये हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्यात येत असून, लव जिहादला प्रोत्साहन दिले जात आहे, असे मत लोकांकडून व्यक्त केले जात आहे. तसेच सध्या सोशल मीडियावर #Boycott_BigBoss, #जिहादी_बिगबॉस असे हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहेत. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो बिग बॉसच्या या पर्वामधील नसून आधीच्या पर्वामधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा फोटो बिग बॉसच्या ९व्या पर्वामधील असून हे पर्व २०१५ मध्ये प्रदर्शित झाले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोमध्ये माजी स्पर्धक किश्वर मर्चंड आणि सुयश राय दिसत आहेत. या दोघांनी कपल म्हणून बिग बॉसच्या घरात एण्ट्री केली होती. बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर १६ डिसेंबर २०१६ रोजी दोघे विवाह बंधनात अडकले. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो ९व्या पर्वामधील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आणखी वाचा : #Boycott_BigBoss: बेड शेअरींगचा फंडा बिग बॉसला पडला महागात
बिग बॉस १३च्या फॉरमॅटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. शोमध्ये सहभागी झालेल्या महिला स्पर्धक आणि पुरुष स्पर्धक बेड शेअर करतात. शो लॉन्चच्या वेळी सलमानने महिला स्पर्धकांना घरात एण्ट्री करण्याआधी एका पुरुष स्पर्धकाला ‘BFF’ (बेड फ्रेंड फॉरेवर) म्हणून निवडण्याचा पर्याय दिला होता. या निवडलेल्या पुरुष स्पर्धकासोबत महिला स्पर्धकाला बेड शेअर करावा लागला आहे. दरम्यान एका काश्मीरी स्पर्धकाला हिंदू मुलीसोबत बेड शेअर करावा लागत असल्याने शोमध्ये लव जिहादला प्रोत्साहन दिले जात असल्याचे म्हटले जात होते. भारतीय संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्यात येत असल्याचा आरोपही अनेकांनी केला होता. मात्र व्हायरल झालेला हा फोटो नेटकऱ्यांचा खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
First Published on October 10, 2019 11:12 am