एक तर हातात चित्रपट नाहीत. सैफव्यतिरिक्त बाहेर कुठे फिरणे नाही की हल्लागुल्ला नाही. करीना कपूरने सैफच्या ‘खान’दानात प्रवेश केल्यापासून स्वत:ला एका कोषात अडकवून घेतले आहे. आणि तरीही तिच्यामागचे चर्चेचे गुऱ्हाळ काही संपत नाही. याआधी करीनाने सहा चित्रपट नाकारले म्हणून चर्चा झाली होती. म्हणजे तिनेच माध्यमांसमोर या गोष्टी सांगितल्या होत्या. पण, या खुल्या कबुलीजबाबामुळे तिची प्रसिद्धी होण्यापेक्षा त्रासच जास्त झाला. आताही शाहीदबरोबर चित्रपट करणार याची खरी चर्चा व्हायला होती. मात्र, झाले भलतेच.. त्याच्यामुळे करीना सध्या चिडली आहे.
‘देढ इश्किया’ फेम दिग्दर्शक अभिषेक चौबे याच्या आगामी ‘उडता पंजाब’ चित्रपटात शाहीद कपूर आणि आलिया भट्ट मध्यवर्ती भूमिकेत आहेत. मात्र, या चित्रपटाच्या कथेतली तिसरी नायिका म्हणून अभिषेकने चक्क करीनाला विचारणा के ली. आणि अन्य चित्रपटांसाठी आढेवेढे घेणाऱ्या करीनाने या चित्रपटाला लगेच होकार दिला. इतक्या वर्षांनी शाहीद आणि करीना पडद्यावर एकत्र दिसणार याची जास्त चर्चा होईल, अशी अपेक्षा अगदी करीनाचीही असणे साहजिक आहे. पण, प्रत्यक्षात तसे झाले नाही. या चित्रपटात आयुषमान खुराणाची मुख्य भूमिका होती. मात्र, करीनाच्या आग्रहामुळे आयुषमानला चित्रपट सोडावा लागला, अशी पुडी कोणी तरी सोडली.
‘उडता पंजाब’ चित्रपटासाठी आयुषमान खुराणा हा अभिषेकची पहिली निवड होता. त्याचे कारण आयुषमान स्वत: पंजाबी आहे आणि तिथेच लहानाचा मोठा झाला आहे. त्यामुळे त्याच्या बोलण्यातील पंजाबी हेल ही नायकाच्या भूमिकेसाठी जमेची बाजू होती. पण, काही कारणांमुळे आयुषमान या चित्रपटातून बाहेर पडला आहे. त्यानंतर शाहीद कपूरची तिथे वर्णी लागली. मात्र, या सगळ्या प्रकरणांत आयुषमानला काढण्याचा अट्टहास करीनाचा होता, अशी वावडी उठवण्यात आली. या सगळ्या प्रकारांमुळे चिडलेल्या बेबोने आपल्या निकटवर्तीयांकडून खुलासा केला आहे. कुठल्याही चित्रपटाप्रमाणे कलाकारांची निवड करणे ही दिग्दर्शकांची जबाबदारी असते. त्याचा निर्णय अंतिम असतो. ‘उडता पंजाब’ चित्रपटातील कलाकारांची निवड ही पूर्णपणे अभिषेकने केली आहे. करीनाला केवळ या चित्रपटात आणि तिच्या भूमिकेत रस असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एवढेच नाही तर या प्रकरणात आपल्याला नाहक का गोवले जात आहे, असा सवालही करीनाने केला आहे.