अडीच वर्षाचे वय म्हणजे खेळण्याचे आणि मोठ्यांकडून लाड करून घेण्याचे. जिथे बॉलीवूड अभिनेत्रींना भारताचे पंतप्रधान कोण हे माहित नाही तिथे अडीच वर्षाच्या चिमुरडीच्या तोंडून तुम्हाला भारताबद्दलची माहिती ऐकावयास मिळाली तर? म्हणूनच या चिमुरडीने दिलेली उत्तरं आपल्याला आश्चर्यचकीत करतात. विशेष म्हणजे या मुलीचा व्हिडीओ बॉलीवूडचा दबंग खान सलमानने फेसबुकवर पोस्ट केला असून त्याला ‘ये देखो’ असं आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे.
सदर व्हिडिओत अडीच वर्षाच्या मेहेर नावाच्या चिमुकलीने तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे कोणाच्याही मदतीशिवाय दिली आहेत. सुरुवातीला तिचे नाव, वय, आपल्या देशाचे नाव असे प्रश्न विचारण्यात आले. पण, खरी गंमत पुढे येते जेव्हा तिला भारताच्या तिरंग्याबाबत विचारण्यात येते. तिला तिरंग्यात कोणते रंग आहेत इतकेच माहित नाही तर तिरंग्यातील प्रत्येक रंगाचे महत्त्वही माहित आहे. भारत केव्हा स्वतंत्र झाला, राष्ट्रीय प्राणी, पक्षी, फळ, झाड, खेळ, राष्ट्रगीत, राष्ट्रगान हेदेखील माहित आहे. तुम्ही म्हणाल हे तर कोणीही सांगेल, पण पुढे तिला विचारण्यात आलेले प्रश्न आणि तिने त्वरीत दिलेली उत्तरे ही खरंच थक्क करतात. लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, लालबहादुर शास्त्री यांची घोषवाक्ये ती अचूक सांगते. भारताचे पहिले राष्ट्रपती, पहिले पंतप्रधान तसेच रिलायन्स, टाटा, एअरटेल, व्हिडिओकॉन या कंपन्यांचे मालक कोण आहेत हे विचारल्यावर त्याची उत्तरेसुद्धा तिने अगदी सहज दिली. तुम्हाला धक्का बसला ना, मग तिने अजून कोणत्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत ते या व्हिडीओत पाहा आणि त्यानिमित्ताने तुमचेही सामान्यज्ञान पडताळून पहा.