अभिनेत्री तनुश्री दत्ताने प्रसारमाध्यमांशी बोलण्याऐवजी थेट पोलिसांत जाऊन तक्रार करावी अशी प्रतिक्रिया अभिनेते अन्नू कपूर यांनी दिली. नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप करताना हा मीडिया ट्रायल कशासाठी, असा सवाल त्यांनी तनुश्रीला विचारला आहे. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नानांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्रीनं केला आहे.

‘जर तिने केलेले आरोप खरे असतील तर त्या व्यक्तीला शिक्षा ही झालीच पाहिजे. मग ते नाना पाटेकर असोत किंवा अन्नू कपूर. तुम्ही आधी पुरावे सादर करा आणि मग दोषींना शिक्षा दिली जाणार. पण पुराव्यांशिवाय तुम्ही फक्त आरोप करत असाल तर तुमच्यावर असंख्य प्रश्न उपस्थित केले जातील आणि त्यांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. हा मीडिया ट्रायल कशासाठी? तुम्ही पोलिसांकडे का मदत मागत नाही? आम्ही कोणाच्याही बाजूने किंवा विरोधात नाही. पण पुराव्यांविना फक्त आरोप होत असतील तर तुमच्या उद्देशांवर शंका उपस्थित केली जाणारच,’ असं अन्नू कपूर म्हणाले.

वाचा : तनुश्री- नाना वादावर रणवीर- दीपिका म्हणतात..

बॉलिवूडमधल्या बऱ्याच कलाकारांनी तनुश्रीची पाठराखण केली आहे. नानांनी मात्र तिचे आरोप फेटाळत कायदेशीर नोटीस बजावली आहे. या संपूर्ण प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी नाना पाटेकर ८ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदसुद्धा घेणार आहेत.