‘सावरिया’ या पहिल्या चित्रपटात ठेच लागल्यानंतर पुढे प्रत्येक पाऊल अगदी जपून आणि विचारपूर्वक टाकणाऱ्या रणबीर कपूरने निर्मिती क्षेत्राबाबतही ठोस विचार करून ठेवला आहे. पुढेमागे निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा विचार पक्का झाला, तरीही आपण आपल्या बापजाद्यांच्या ‘आर के फिल्म’ या बॅनरखाली निर्मिती करणार नाही, असे त्याने आत्ताच स्पष्ट केले आहे. निर्मिती संस्थेला संजीवनी वगैरे देणे आपल्याला मान्य नाही. आपण आपली स्वत:ची निर्मिती संस्था स्थापन करू,असे रणबीरने स्पष्ट केले आहे.
‘शो मॅन ऑफ द मिलेनिअम’ अशी ओळख असलेल्या राज कपूर यांनी स्थापन केलेली ‘आर के फिल्म’ ही संस्था १९९९पासून मृतावस्थेत आहे. ‘आ अब लौट चले’ या चित्रपटानंतर आरके फिल्मचा एकही चित्रपट आलेला नाही. त्यामुळे पुढेमागे या निर्मिती संस्थेला संजीवनी देणार का, असा प्रश्न रणबीरला विचारण्यात आला होता.
‘आवारा’, ‘बूट पॉलिश’, ‘श्री ४२०’, ‘जागते रहो’ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या ‘आरके फिल्म’चा आब राखणारा एखादा विषय डोक्यात आला, तर मात्र रणबीर ‘आरके’तर्फे हा चित्रपट करायलाही तयार आहे. एखाद्या चांगल्या दिग्दर्शकाने चांगली पटकथा आणली, तर आपण अपेक्षेपेक्षा जास्त लवकर निर्मिती क्षेत्रात उतरू, असे त्याने सांगितले.