सलमान खान आणि बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी तब्बल १९ वर्षांनी एकत्र येणार आहे. भन्साळींच्या आगामी चित्रपटात सलमान खान प्रमुख भूमिकेत असणार आहे. काही दिवसांपूर्वीच याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात शेवटचं सलमाननं भन्साळींसोबत काम केलं होतं. त्यानंतर या जोडीनं एकत्र काम करण्याचा योग आलाच नाही. सलमानचं नाव निश्चित झाल्यानंतर आता भन्साळी मुख्य अभिनेत्रीच्या शोधात आहेत यासाठी प्रियांका चोप्राच्या नावाचा विचार ते करत असल्याची चर्चा आहे.
एका कार्यक्रमात प्रियांकानं भन्साळींशी चित्रपटासंदर्भात बोलणं चालू असल्याचं मान्य केलं. प्रियांका आणि सलमान खान या दोघांमधला छुपा वाद बॉलिवूडला माहिती आहे. ‘भारत’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू व्हायला अवघे १० दिवस बाकी असताना प्रियांकानं नकार कळवला होता. तिनं ऐनवेळी दिलेल्या नकारामुळे सलमान कमालीचा नाराज होता. प्रियांका आणि सलमान दोघंही १० वर्षांनंतर एकत्र काम करणार होते. मात्र ऐनवेळी काढता पाय घेतल्यानं सलमानची नाराजी तिनं ओढवून घेतली होती. तिच्या अव्यवहारिक वागण्याबद्दल सलमाननं एका कार्यक्रमात उघडपणे आपली नाराजी बोलूनही दाखवली होती.
तर दुसरीकडे प्रियांकासोबत कधीही काम न करण्याचा निर्णय सलमाननं घेतला असल्याच्या चर्चाही गेल्यावर्षीपर्यंत होत्या. आता या दोघांमधला वाद मिटवून त्यांना एकत्र आणण्यास भन्साळी यशस्वी होतात का हे पाहण्यासारखं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2019 9:18 am