‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्यातील अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडिओमुळे मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर प्रकाशझोतात आली. सोशल मीडियावर तिची खोडकर अदा आणि भुवया उंचावणं इतकं व्हायरल झालं की पाहता पाहता प्रियाचा उल्लेख ‘नॅशनल क्रश’ म्हणूनही केला जाऊ लागला. ‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटालाही प्रदर्शनापूर्वीच प्रचंड लोकप्रियता मिळाली. या गाण्यातून प्रियासोबत झळकलेला अभिनेतासुद्धा तरुणींची मनं जिंकून गेला.

रोशन अब्दुल रहूफ आणि प्रियाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कलाविश्वात चर्चेचा विषय ठरत नाही तोच त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीवरही सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. प्रिया आणि रोशन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आता सोशल मीडियावर या दोघांनीबही आपला असा वेगळा चाहता वर्ग तयार करण्यात यश मिळवलं आहे. प्रियाची प्रत्येक पोस्ट ही चर्चेचा विषय ठरते. सध्याही अशीच एक पोस्ट चाहत्यांसोबतच रोशनचंही मन जिंकून गेली असणार यात शंका नाही. असंख्य चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियाने तिच्या आवडत्या सहकलाकाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्या दोघांचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘माझ्या आयुष्यातील आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याविषयी मी फार काहीच बोलण्याची गरज नाही. कारण, तुला सर्वकाही ठाऊक आहे.’

https://www.instagram.com/p/BhrCFaiDvP5/

वाचा : ऑलिम्पिक पदकाचा वेध घेण्याचे स्वप्न!

एक सहकलाकार म्हणून प्रियाने केलेली ही पोस्ट रोशनचा वाढदिवस आणखी खास करुन गेली असणार यात वाद नाही. प्रिया आणि रोशन या दोघांनीही कलाविश्वात ज्या दणक्यात सुरुवात केली आहे ते पाहता येत्या काळात हीच लोकप्रियता टीकवण्यात ते यशस्वी होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुख्य म्हणजे मल्याळम चित्रपटसृष्टीतील या दोन्ही कलाकारांना विविधभाषी प्रेक्षकांनीही आपलंसं केलं आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ही एक जमेची बाजू ठरतेय.