07 July 2020

News Flash

हळवा पोलीस चरित्रपट!

 फ्रँक शॅंकविट्झ नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने १९८०च्या दशकात एका सात वर्षीय मरणासन्न मुलाची पोलीस बनण्याची इच्छा पूर्ण केली होती

(संग्रहित छायाचित्र)

पंकज भोसले

काही चित्रपट भलताच तोंडवळा घेऊन आपल्या समोर येतात आणि अनपेक्षित विषयाचा पाठपुरावा करीत असल्याचे उशिराने लक्षात येते. २०१७ साली आलेला ‘मदर’ (२०१७) हा आरंभिक पातळीवर सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणून वाटचाल करीत असला, तरी नंतर तो पर्यावरण वगैरेसारख्या वेगळ्याच विषयाला फाटे फोडताना दिसतो. ‘टॉल मॅन’ (२०१२) नावाचा हॉरर म्हणून हाताळणी सुरू झालेला चित्रपट पुढे स्त्रीवादावर सरकायला लागतो. अर्थातच निराशा न केल्यास अशा चित्रपटांतील चकवे स्वागतार्ह असतात; पण तरीही प्रेक्षकांमध्ये काही प्रमाणात फसल्याची जाणीव शिल्लक राहते. चरित्रपट म्हणून तयार होणारे चित्रपट बहुतांश वेळा समाजातील थोरामोठय़ांचे आणि आपल्या योगदानाने जगभर ओळख मिळविणाऱ्यांवरच बनविले जातात. लोकोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींची जडणघडण, त्यांच्या कार्याची ऊर्जा अधोरेखित करून स्फूर्तीदायक सिनेमा बनविण्याकडे चित्रकर्त्यांचा ओढा असतो अन् प्रेक्षकांनाही देव्हाऱ्यात बसविण्यासाठी लोकोत्तर व्यक्तींवरच्या सिनेमांची काळानुरूप गरज भासतच असते. थिओ डेव्हिस या अमेरिकी दिग्दर्शकाचा ‘विशमॅन’ त्याच्या हाताळणीमुळे एक मोठा चकवा त्याच्या प्रेक्षकापुढे निर्माण करतो. पोलीसपटाच्या आवेशात तो एका चांगल्या चरित्रपटाची भेट घडवून देतो.

फ्रँक शॅंकविट्झ नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने १९८०च्या दशकात एका सात वर्षीय मरणासन्न मुलाची पोलीस बनण्याची इच्छा पूर्ण केली होती. ती पूर्ण करण्यासाठी आपल्या भरती नियमांत बदल करून पोलीस दलानेदेखील त्याला सहकार्य केले होते. या घटनेनंतर आपल्या मित्रांना सोबत घेऊन ‘मेक ए विश फाऊंडेशन’ नावाची संस्था त्याने उभारली. आज त्या संस्थेच्या जगभर शाखा तयार झाल्या असून आजारी आणि मरणासन्न व्यक्तींच्या हजारो इच्छा पूर्ण झाल्या आहेत. फ्रँक शॅंकविट्झच्या भूत आणि वर्तमान काळातील कथा आणि त्याच्या जडणघडणीची गोष्ट ‘विशमॅन’मध्ये रंगविण्यात आली आहे.

चित्रपट सुरू होतो तो फ्रँक शँकविट्झच्या कुटुंब भंगलेल्या बालपणापासून. वडिलांच्या मायेला पारखा झालेला आणि आईच्या हेकट स्वभावामुळे फरपटत गेलेल्या फ्रँकला अनाथासम आयुष्य जगण्याशिवाय पर्याय उरत नाही. मधल्या वीसेक वर्षांत आपल्यातील उणेपणावर मात करीत फ्रँक पोलीस दलामध्ये भरती होतो. महाकाय शरीरयष्टीचा फ्रँक (अ‍ॅण्ड्रय़ू स्टील) अ‍ॅरेझोनाजवळील महामार्गालगत वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण ठेवत असतो. त्याच्या संवेदनाशून्य कारवायांमुळे इतर शहरांतील पोलीस दलातही लोकप्रिय असतो, तर काहींच्या डोळ्यांत त्याची वाढती प्रसिद्धी खुपत असते. कोणताही नात्याचा पाश भोवती नसल्याने तो अधिक सक्षमपणे आपली कामगिरी बजावत असतो.

एका मद्यपी जोडप्यावर कारवाईदरम्यान फ्रँकवर हल्ला होतो. आपला बचाव करताना तोही प्रतिहल्ला करतो. मात्र पोलीस दलातीलच त्याचे शत्रू या प्रकरणातील व्यक्तींना हाताशी धरून त्याच्याविरोधात मानवी हक्क भंगाचा आरोप लावतात. त्यातून त्याची चौकशी सुरू होण्याआधीच एका मोठय़ा अपघातात काही सेकंद बंद झालेले त्याच्या हृदयाचे ठोके अचानक पूर्ववत होऊन त्याला जीवदान मिळते. मृत्यूपासून चमत्कारासारखे मिळालेले जीवदान हे नक्कीच कोणते तरी चांगले कार्य पार पाडण्यासाठी झाले आहे, हा विश्वास त्याला डॉक्टर देतात.

‘विशमॅन’ हा श्रद्धा, नातेसंबंध आणि भावना हरविलेल्या एका रांगडय़ा पोलिसाचे हळव्या व्यक्तीत रूपांतर होण्याचा प्रवास दाखवितो. किटी (कर्बी ब्लिस ब्लॅण्टन) या पोलीस दलातीलच तरुणीशी त्याची ओळख वाढते आणि तिच्या हट्टाग्रहातून फ्रँक मरणासन्न मुलाची इच्छा पूर्ण करतो. या दरम्यान त्याच्या भूतकाळाशी दडविलेला धागाही पूर्ण केला जातो आणि त्याच्याबद्दल असूया असलेल्या सहकाऱ्यांनी आणलेल्या बालंटातून त्याची सहज मुक्तता होते.

चित्रपट फ्लॅशबॅक आणि कमबॅकच्या आधारे एकाच वेळी फ्रँकच्या आयुष्यातील तीन वेगवेगळ्या अवस्थांना दाखविण्याचा प्रयत्न करतो. कुणाच्या तरी मदतीमुळे लादलेले अनाथपण तरून गेलेला लहानपणातील फ्रॅन्क, कुणाचीही मदत घेण्याची गरज लागू नये इतक्या सक्षम अवस्थेत पोहोचलेला फ्रँक आणि कुणाचीही मदत करण्यास तत्पर असलेला फ्रॅन्क येथे दिसतो.

मेलोड्रामिक वळणे, गरजेइतपत रोमान्स आणि पोलिसी कामगिरी यांचे जमलेले संतुलन चित्रपट आवडण्यास पुरेपूर मदत करतो. एरव्ही आपल्याला राष्ट्रपुरुष आणि काळाला पुरून उरणाऱ्या व्यक्तींवरील चरित्रपट पाहायची सवय झाली आहे. बऱ्याच पातळीवर अज्ञात असलेल्या लोकोपयोगी कार्यकर्त्यांची कहाणी म्हणून ‘विशमॅन’ या वर्षांतील महत्त्वाचा चरित्रपट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 1:05 am

Web Title: wish man movie review abn 97
Next Stories
1 वेबवाला : सुरस कथा पण.
2 चित्रचाहूल : वाहिन्यांचा पौराणिक पवित्रा
3 ‘चाची ४२०’मधली बालकलाकार आता आहे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री
Just Now!
X