22 October 2019

News Flash

‘ठाकरे’साठी नवाजुद्दीनची कास्टिंग अवघ्या दोन मिनिटांत केली- संजय राऊत

संजय राऊत प्रस्तुत व लिखित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील बाळासाहेब ठाकरे या झंझावत्या व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बायोपिकमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी अवघ्या दोन मिनिटांत नवाजची निवड केल्याचं या चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी सांगितलं.

‘ठाकरे’च्या ट्रेलर लाँचदरम्यान संजय राऊत म्हणाले, ‘बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी अवघ्या दोन मिनिटांत कास्टिंग झाले. एकदा प्रवासात मी ‘फ्रिकी अली’ हा चित्रपट पाहत होतो. नवाजुद्दीन त्यात गोल्फ खेळाडूची भूमिका साकारत होता. ‘ठाकरे’ चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतल्यापासूनच मला नवाजुद्दीनचा चेहरा बाळासाहेबांसारखा दिसू शकतो, हे मला जाणवलं.’

नवाजच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी संजय राऊत यांनी त्याला एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं होतं. या भेटीविषयी ते पुढे सांगतात, ‘मी नवाजला एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं. तो समोरून चालत येत असताना त्याची शैली आणि हावभाव पाहून एका क्षणाचाही विलंब न करता मी त्याला सांगितलं की, मी बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित मी चित्रपटाची निर्मिती करत आहे आणि त्यात तू हिंदूहृदयसम्राटांची भूमिका साकारणार आहेस.’

संजय राऊत प्रस्तुत व लिखित ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले आहे.

First Published on January 11, 2019 2:14 pm

Web Title: within 2 minutes i have decided to cast nawazuddin siddiqui in thackeray biopic says sanjay raut