18 February 2019

News Flash

#MeToo : महिला पत्रकारासोबतही साजिदनं केलं लैंगिक गैरवर्तन

तिनं सभ्यतेचा मुखवटा लावून वावरणाऱ्या साजिदची विकृती आपल्या ट्विटर पोस्टद्वारे समोर आणली आहे.

लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे साजिद खान अडचणीत आला आहे.

सभ्यतेचा आव आणून झगमगत्या दुनियेत वावरणाऱ्या आणखी एका बॉलिवूड दिग्दर्शकाचा चेहरा समोर आला आहे. हा दिग्दर्शक म्हणजे फराह खानचा भाऊ साजिद खान होय. ‘हाऊसफुल्ल’, ‘हिंमतवाला’सारख्या फ्लॉप चित्रपटाचं दिग्दर्शन त्यानं केलंय. अभिनेत्री सलोनी चोप्रानं केलेल्या आरोपांनंतर आता मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या एका महिला पत्रकारानंही त्याची पोलखोल केली आहे.  महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनी सांगितलेला साजिदचा अनुभव अधिक धक्कादायक होता. तिनं सभ्यतेचा मुखवटा लावून वावरणाऱ्या साजिदची विकृती आपल्या ट्विटर पोस्टद्वारे समोर आणली आहे.

करिश्मा उपाध्याय यांची ट्विटर पोस्ट
मी एका वृत्तपत्रासाठी काम करत होते. २००० सालीची गोष्ट. पहिल्यांदा मी साजिद खानची मुलाखत घ्यायला गेले होते. त्यानं मला मुलाखतीसाठी स्वत:च्या घरी बोलावलं होतं तो त्याच्या बहिणीसोबत राहायचा. पण या मुलाखतीत त्यानं माझ्याशी अत्यंत अश्लिल संभाषण करण्याचा प्रयत्न केला पण मी वारंवार त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत हे संभाषण थांबवण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर त्याच्याकडे असलेल्या DvD दाखवण्याच्या बाहाण्यानं तो खोलीतून बाहेर गेला. त्याचा हेतू ठिक नसल्याचं लक्षात आल्यानंतर मी तिथून लगेचच बाहेर जायला उठले पण त्यानं माझा रस्ता अडवला. त्यानं मला चुकीच्या पद्धीतनं स्पर्श केला. मी त्याला ढकललं आणि त्याच्या घरातून धावत सुटले. मी विले पार्लेपासून ते माझ्या कार्यलयात पोहोचेपर्यंत रडत होती. शेवटी मी ती मुलाखत शब्दबद्ध केली. माझा नाईलाज होता कारण तेच माझं काम होतं.

एमटीव्ही चॅनेलसाठी काम करताना दुर्दैवानं त्याच्यासोबत काम करण्याची वेळ माझ्यावर आली. मला काम करायचं नव्हतं पण साजिद खान सारख्या माणसामुळे मला माझी नोकरी गमवायची नव्हती. पहिल्या मिटिंगमध्येच मी त्याला माझ्याशी गैरवर्तन न करण्याची तंबी दिली त्यावेळी तो जे काही बोलला ते मी आयुष्यात विसरू शकत नाही. तू पूर्वीपेक्षाही अधिक बेढब दिसू लागली आहे त्यामुळे मी तुला काहीही करणार नाही असं म्हणत तो राक्षसी हसला.

करिश्मा उपाध्याय आणि अभिनेत्री सलोनी चोप्रा या दोघांनी केलेल्या आरोपाची दखल घेत अखेर अक्षयनं साजिद खान सोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हाऊसफुल ४ चं चित्रीकरणही थांबवण्याची विनंती त्यानं निर्मात्यांना केली आहे.

First Published on October 12, 2018 2:11 pm

Web Title: woman journalist accused sajid khan of sexual harassment
टॅग MeToo