टीव्ही अभिनेता करण सिंह ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला ओशिवरा पोलिसांनी सोमवारी अटक केली. संबंधित महिलेने स्वत:वर हल्ला झाल्याची खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे.  करणविरोधातील तक्रार मागे घेण्याची धमकी दिल्याचे तिने म्हटले होते. मात्र, पोलीस तपासात या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे उघड झाले आहे. महिलेच्या वकिलानेच हल्ल्याचा बनाव रचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘२५ मे रोजी बाइकवरील दोन युवकांनी माझ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी मला दिली व पेपर कटरने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे ‘खटला मागे घे’ असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी माझ्यावर फेकली,’ असं तिने तक्रारीत म्हटलं. २७ मे रोजी पोलिसांनी हल्ला करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतलं. त्यापैकी एक जण महिलेच्या वकिलाचा चुलत भाऊ असल्याचं तपासात स्पष्ट झालं. संबंधित महिलेने हा हल्ला घडवून आणण्यासाठी १० हजार रुपये दिल्याचं त्याने पोलिसांसमोर कबूल केलं. इतकंच नव्हे तर महिलेच्या वकिलानेच हल्ल्याचा बनाव रचल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान संबंधित महिलेने हे आरोप फेटाळले आहेत.

अभिनेता करणने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप या महिला ज्योतिषाने केला होता. या प्रकरणी पीडित महिलेने मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत करणला अटक केली होती. महिनाभर तुरुंगात राहिलेल्या करणला मुंबई हायकोर्टाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.