हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी समाजातील सर्व स्तरातून होत आहे. तसेच सोशल मीडियावर या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये चित्रपट निर्माता डेनियल श्रवणने सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारकडे संतापजनक मागणी केली आहे.

महिलेची हत्या न करता गुन्हेगारांनी बलात्कार करून थांबावे यासाठी सरकारने कायदेशीर तरतुदी करून प्रोत्साहन द्यावे अशी विचित्र मागणी श्रवणने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केली आहे. तसेच १८ वर्षांवरील मुलींनाही याबाबत प्रशिक्षित करण्यात यावे असे सांगताना श्रावणने चक्क मुलींनी पुरूषांच्या कामवासनेस प्रतिकार करू नये असा सल्ला दिला आहे. हे केले तरच अशाप्रकारच्या हत्या थांबतील असे तर्कही त्याने मांडले आहेत.

श्रवणनची ही पोस्ट काही मिनिटातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आणि त्याच्यावर तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला. काही वेळातच श्रवणने त्याची ही पोस्ट डिलीट केली. मात्र अनेकांनी श्रवणला उपचारांची गरज आहे म्हणत सुनावले आहे.