अफगाणिस्तान राजधानी काबूलच्या अंतरिम महापौरांनी शहरातील अनेक महिला कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याचे आदेश दिले आहेत. पुरुषांना जे शक्य नाही ते महिलांना करण्याची परवानगी देण्याचा आदेश महापौरांनी दिला आहे. त्यामुळे आता सहिष्णू आणि सर्वसमावेशक सरकारचे आश्वासन देणाऱ्या तालिबानने सार्वजनिक जीवनातही महिलांवर कठोर निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे.

हमदुल्लाह नमोनी यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले की, जे काम पुरुषांऐवजी स्त्रिया करु शकतात त्यांनाच कामावर येण्याची करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये डिझाईन आणि अभियांत्रिकी विभागातील कुशल कामगार तसेच महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

त्यानंतर आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी पुन्हा एकदा तालिबानी राजवटीवरुन टीका केली आहे. जावेद अख्तर यांनी काबूलमधील महिलांवरील नव्या निर्बंधाबाबत ट्विट करत तीन तलाकच्या मुद्द्यावरुनही जोरदार टीका केली आहे.

“अलजजीराच्या माहितीनुसार काबूलच्या महापौरांनी सर्व काम करणाऱ्या महिलांना घरीच राहण्याचे आदेश दिले आहेत. मला आशा आहे की सर्व महत्वाच्या मुस्लिम संस्था याचा निषेध करतील कारण हे सर्व धर्माच्या नावाखाली केले जात आहे. कालपर्यंत तीन तलाकच्या बचावासाठी घोषणा देणारे सगळे कुठे आहेत?,” असे जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

१९९०च्या दशकात तालिबान्यांनी मुली आणि महिलांना शाळेत जाण्यावर आणि काम करण्यास बंदी घातली होती. आता पुन्हा तालिबानच्या नवीन सरकारने मुली आणि महिलांच्या हक्कांवर निर्बंध आणणारे अनेक आदेश जारी केले आहेत. गेल्या महिन्यात तालिबानने सत्ता हाती घेण्यापूर्वी शहरात सुमारे ३,००० महिला कामगार होत्या आणि त्या सर्व विभागांमध्ये काम करत होत्या अशी माहिती महापौर हमदुल्ला नमोनी यांनी दिली.