८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव. प्रत्येक स्त्रीचा, तिच्या आत्मसन्मानाचा आणि तिच्या कसोटीचाही. केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागलेल्या वेदनेचा आणि अनुभवता आलेल्या सर्जनत्वाचाही! महिला, मुलगी, आई, बहिण, प्रेयसी अशा विविध रुपांत आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर ‘ती’ची भूमिका फारच महत्त्वाची असते. पण, फक्त ‘ती’चं महत्त्व या एकाच दिवशी सर्वांच्या दृष्टीनं महत्त्वाचं का असतं? स्त्रीचं अस्तित्व, तिची ओळख या एका दिवसापुरतीच मर्यादित असते का? असे बरेच प्रश्न हल्ली अनेकांच्या मनात घर करतात. याच प्रश्नांबद्दल आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना नक्की काय वाटतं हे आपण आज जाणून घेणार आहोत. गुलाबी हा स्त्रियांसाठी नेहमीच आवडता रंग असतो. चॉकलेट्स म्हणजे कोणत्याही मैत्रिणीची आवडती गोष्ट…. ही अशी विचारसरणी कुठेतरी बदलण्याची गरज आहे. त्यामुळे रंग, आवडीनिवडी, व्यावसायिक क्षेत्रांची निवड या सर्वच बाबतीत आजवर महिलांना गृहित धरणं कुठेतरी थांबलं पाहिजे ही गरज आज प्रकर्षाने व्यक्त केली जात आहे. याबद्दलच आपले विचार व्यक्त करत आहेत आपली लाडकी कलाकार मंडळी….

मुलगा जन्माला आला की जबाबदारी जास्त वाढते
“अगदी लहानपणापासून मुलींना सांगितल जातं की, हे करू नकोस गं बाई…., असे कपडे घालू नकोस हं!, हे बोल किंवा हे बोलू नकोस…., इतक्याच वाजता घरी ये…. मग या सगळ्या गोष्टी मुलाला का नाही सांगितल्या जात? आपण अनेक गोष्टी मुलींना शिकवतो मुलाला का नाही शिकवत? मला असं वाटतं की, मुलगी घरात जन्माला आली की जबाबदारी वाढते यापेक्षा मुलगा जन्माला आला की पालकांची जबाबदारी जास्त वाढते. जेव्हा याची जाणीव समाजाला होईल तेव्हा समाजातील सगळ्या मुली सुरक्षित होतील, ती जाणीव होणं गरजेचं आणि महत्वाचं आहे.
सोनाली कुलकर्णी ( कॉमेडीची बुलेट ट्रेन )