परिस्थिती काहीही असो, कोणतीही अडचण येवो सकारात्मक विचारांनी, खंबीरपणे तोंड देण्याचं उदाहरण ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या नायिकांनी समोर ठेवलं आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर, समस्त महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करतानाच सकारात्मक विचार करून खंबीर होण्याचा संदेश ही वाहिनी देत आहे.

आपल्या मर्यादा ओलांडून अशक्य ते प्राप्त करण्याचा, स्वत:ला सिद्ध करण्याचा विचार स्टार प्रवाहने दिला आहे. हा विचार केवळ सांगण्यापुरता नाही, तर पुढचं पाऊल, दुहेरी, नकुशी, गोठ आणि आम्ही दोघं राजा राणी या दैनंदिन मालिकांतील नायिकांमध्येही दिसतो. त्यामुळेच या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. या मालिकांनी स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं आहे.

‘पुढचं पाऊल’मधील आक्कासाहेब अत्यंत करारी व्यक्तिमत्त्वाच्या आहेत. जे खरं आहे ते सिद्ध करण्यासाठी, गरजूला मदत करण्यासाठी त्या काहीही करायला तयार असतात. नावापासून आपण समाजाला नको आहोत, याची जाणीव असूनही खचून न जाता परिस्थितीला नकुशीनं तोंड दिलं. लग्नानंतरही ती आत्मविश्वासानं उभी राहिली. गोठमधील राधा उत्साही आहे. तशीच ती समजूतदार आणि निर्भीड देखील आहे. परंपरांना प्रश्न विचारण्याचं धाडस तिच्यात आहे. बयो आजी आणि घरातल्या पुरुषी वर्चस्वाच्या विरोधात ती उभी राहते. तर, आम्ही दोघं राजा राजा राणी या मालिकेतील शहरी वातावरणातली मधुरा स्मार्टपणे सगळ्या गोष्टी सांभाळून घेत अडचणींवर मात करते. दुहेरीमधील मैथिली सकारात्मक विचाराची आहे. आपल्या बहिणीसाठी ती खंबीरपणे उभी राहिली. ती नेहमी सकारात्मक विचार करणारी आहे. ‘लेक माझी लाडकी’ मधली अनाथ मीरा अतिशय सुसंस्कृत आणि समजूतदार आहे. तर राजा शिवछत्रपती मालिकेत जिजाऊ स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा देतात, शिवाजी महाराजांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात.

बदलत्या काळात स्त्रियांनी खचून न जाता परिस्थितीला तोंड देण्याची गरज आहे. प्रत्येक स्त्रीनं स्वत:तला  आत्मविश्वास जागृत करणं महत्त्वाचं आहे. स्वत:तला आत्मविश्वास महिलांनी जागृत करावा, या शुभेच्छा  महिला दिनानिमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीच्या नायिका मालिकांच्या माध्यमातून देणार आहेत.