मुंबई : ख्रिस्तोफर नोलनच्या ‘टेनेट’नंतर भारतात प्रदर्शित झालेल्या ‘वंडर वूमन १९८४’ या हॉलीवूडपटाने ८.५० कोटी रुपयांची कमाई करीत निर्मात्यांसाठी आशेचा किरण दाखवला आहे. टाळेबंदीनंतर प्रेक्षकांनी हिंदी चित्रपटांकडे पाठ फिरवलेली असताना ‘टेनेट’ आणि ‘वंडर वूमन’ला भरभरून मिळणारा प्रतिसाद दिलासादायक आहे.

राज्य शासनाच्या परवानगीनंतर नोव्हेंबर महिन्यात ५० टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे सुरू करण्यात आली. प्रदीर्घ विश्रांतीनंतर सुरू झालेल्या चित्रपटगृहात प्रेक्षक वळवण्यासाठी आधीचे  ‘वॉर’, ‘मलंग’, ‘अंग्रेजी मीडियम’ हे लोकप्रिय चित्रपट पुनर्प्रदर्शित करण्यात आले. ‘सूरज पे मंगल भारी’ आणि ‘इंदू की जवानी’ हे चित्रपटही प्रदर्शित झाले. मात्र करोनाची धास्ती, चित्रपटांची अपुरी प्रसिद्धी आणि प्रदर्शनास मोठे चित्रपट नसल्याने याकडे प्रेक्षकवर्गाने पाठ फिरवली. याच दरम्यान आलेल्या ख्रिस्तोफर नोलनच्या ‘टेनेट’ने ४.८० कोटी रुपयांची कमाई केली.

करोना काळात एखाद्या हॉलीवूडपटाने एवढी कमाई करणे ही चांगली गोष्ट असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. यानंतर ‘वंडर वूमन १९८४’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.५० कोटी तर दुसऱ्या दिवशी २.१५ कोटी रुपये कमावले. या पाच दिवसांत ८.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘टेनेट’नंतर ‘वंडर वूमन’ने चांगली कमाई केली असून, चांगला आशय असल्यास वितरकही चित्रपट प्रदर्शित करतात आणि त्यांना चांगला प्रेक्षकवर्गही मिळतो. ‘छत्तीसगढच्या ‘हंस जान पगली’ या चित्रपटाने मुंबईत चांगली कमाई केली असल्याचे’ सिने वितरक अंकित चंदारामानी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

रात्रीच्या संचारबंदीचा चित्रपटाला फटका

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन संकरावतारामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या रात्रीच्या संचारबंदीचा फटका ‘वंडर वुमन १९८४’ या चित्रपटालाही बसला. राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असल्याने रात्रीचे चित्रपटांचे शो रद्द करण्यात आले. महाराष्ट्रासह, कर्नाटक आणि पंजाब मध्येही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळेही वंडर वुमन या चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे सिने अभ्यासक तरण आदर्श यांनी स्पष्ट केले.

नवीन वर्षांची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटांनी?

२०२१ वर्षांची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटांनी होणार आहे. विजय सेथुपतीची भूमिका असलेली ‘मास्टर्स’ आणि गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित ‘क्रॅ क’ हे दोन चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. याचबरोबर ‘डार्लिग’ हा मराठी चित्रपट तसेच ‘बंटी ओर बबली २’ हा हिंदी चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.