चित्रपटांचे वर्गीकरण सर्वसाधारणपणे प्रौढांसाठीचे चित्रपट, कौटुंबिक चित्रपट आणि लहान मुलांसाठी तयार होणारे अ‍ॅनिमेशनपट या तीन विभागांत केले जाते. यात प्रामुख्याने लहान मुलांसाठी तयार  केल्या जाणाऱ्या कार्टूनपटांना मुख्य सिनेमाच्या प्रवाहात नेहमीच दुय्यम स्थान दिलं जातं. पण सध्या कार्टूनपटच तिकीट बारीवर धमाल करत असल्याचं दिसून येत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कोको’ या अ‍ॅनिमेशनपटाने ‘स्टार वार्स: द लास्ट जेडी’, ‘जस्टिस लीग’, ‘थॉर रॅग्नारॉक’ सारख्या मोठमोठय़ा सुपरस्टार कलाकारांनी भरलेल्या अ‍ॅक्शनपटांचा धुरळा उडवत तिकीट बारीवर एका आठवडय़ात तब्बल ७३.६ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची कमाई केली आहे. यात १८.३ दशलक्ष डॉलर अमेरिकेत तर ५५.३ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आंतरराष्ट्रीय बाजारात मिळवले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ली अनक्रीच यांनी केले असून ‘पिक्सर’ अ‍ॅनिमेशन स्टुडिओमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे.

सध्या हॉलिवुड सिनेसृष्टीत अ‍ॅक्शन, सुपरहिरो आणि प्रौढ विनोदीपटांच्या सिक्वेल-प्रीक्वेलचा खेळ सुरु आहे. त्यामुळे सतत एकाच प्रकारच्या चित्रपटांमुळे वैतागलेले प्रेक्षक आता काहीतरी वेगळ्या आणि हलक्याफुलक्या मनोरंजनाच्या दिशेने वळले असतानाच वॉल्ट डिस्नेचा ‘कोको’ हा अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित झाला आणि त्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. दिग्दर्शक ली अनक्रीच यांच्या मते कार्टूनपट हे पटकथा, चित्रीकरण, संगीत, दिग्दर्शन यांसारख्या कोणत्याही बाबतीत मुख्य प्रवाहातील सिनेमापेक्षा कमी नसतात. परंतु त्यात केवळ कार्टून दिसतात आणि कार्टून हे लहान मुलांच्याच मनोरंजनासाठी असतात हा गैरसमज मनात बाळगून कार्टूनपटांना दुय्यम मानले जाते. ‘कोको’ने मात्र इतर बिग बजेट चित्रपटांना ठेंगा दाखवत आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.

एका आठवडय़ात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच चित्रपटांमध्ये ‘कोको’ पहिल्या स्थानी विराजमान झाला असून त्याखाली अनुक्रमे ‘जस्टिस लीग’ (२५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), ‘वंडर वुमन’ (२० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), ‘थॉर राग्नारोक’ (९.४ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स), ‘द डिझास्टर आर्टिस्ट’ (७.४ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) हे चित्रपट आहेत.