सिनेसृष्टीसोबत राजकीयविश्वाच्याही नजरा ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटावर खिळल्या होत्या. ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सल्लागार संजय बारू लिखित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर- मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकावर या बहुचर्चित चित्रपटाचं कथानक आधारित आहे. ५ मे २०१९ पासून हा चित्रपट झी५ वर प्रकाशित होणार आहे.जगभरातील झी५ च्या सबस्क्राइबर्सना हा चित्रपट पाहता येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे म्हणाले की,” झी५ वर चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भारतातील एका सशक्त व्यक्तिमत्त्वाची कथा या चित्रपटात असून अक्षय खन्ना आणि अनुपम खेर यांनी त्यांच्या भूमिका योग्य निभावल्या आहेत. या दोघांच्याही अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात दिसते. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद होता. झी५ वर प्रकाशित केल्यानंतर जगभरातील प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचेल अशी मला खात्री आहे.”

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी या सिनेमामध्ये मनमोहन सिंग यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. वर्ल्ड डिजिटल प्रीमियरबाबत बोलताना अनुपम खेर म्हणाले की, “अनेक राजकीय गोंधळ आजूबाजूला सुरु असूनसुद्धा मनमोहन सिंग यांनी कधीच आपल्या पदाचा मान विसरून वर्तणूक केली नाही.अत्यंत मितभाषी असणाऱ्या या नेत्याची भूमिका साकारणं हे खूप मोठं आव्हान होतं.या भूमिकेसाठी मी प्रचंड तयारी, सर्व आणि सखोल अभ्यास केला होता. सिनेमागृहातील सकारात्मक प्रतिसादानंतर आता हा चित्रपट झी५ सारख्या डिजिटल माध्यमावर दिसणार आहे. या चित्रपटाच्या कक्षा मर्यादित न राहता जगभर रुंदावल्या आहेत.”

आतापर्यंत झी५ वर ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’,सिम्बा,पॅडमॅन,परमाणू, वीरे दि वेडिंग या हिंदी चित्रपटांचा डिजिटल प्रीमियर झाला आहे. हिंदीशिवाय ‘फास्टर फेणे’, ‘गुलाबजाम’ या मराठी चित्रपटांचाही प्रीमियर झी५ वर झाला होता.