दोन दशकांपूर्वी चिमणी भारतात सर्वाधिक संख्येनं व सर्वत्र आढळत होती. मात्र काही वर्षांपूर्वी चिमण्यांची संख्या कमी झाल्यानं मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त होऊ लागली, आणि म्हणून चिमण्यांचं संवर्धन करण्यासाठी २० मार्च २०१० पासून ‘जागतिक चिमणी दिन’ साजरा करण्यास प्रारंभ झाला. यामध्ये अनेक पर्यावरणवादी सहभागी होऊन चिमण्यांच्या संर्वधनासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. चिमण्यांच्या संवर्धनासाठी अभिनेत्री आलिया भट्टनंही छोटसं पाऊल उचललं आहे.

क्राँकिटचं जंगल, झाडांची कत्तल यामुळे चिमण्यांचा अधिवास नष्ट होत चालला आहे यामुळे चिमण्या नजरेस पडणं अशक्य झाल्या आहेत. या चिमण्यांना परत आणण्याची शपथ ‘जागतिक चिमणी दिना’निमित्त प्रत्येकांनी घ्या. असं ट्विट आलियानं केलं आहे. आलियानं तिच्या चाहत्यांना कृत्रिम घरट्याच्या पर्यायाबद्दलही सुचवलं आहे.

आलिया पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे अनेक उपक्रम राबवते. तिनं ‘CoExist’ या तिच्या फेसबुक पेजवर आपल्या लाखो चाहत्यांना चिमणीच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. प्लास्टिकच्या पिशव्या आणि बाटल्यांपासून चिमण्यांसाठी घरटी आणि फीडर कसं तयार करायचं हे देखील तिनं आपल्या फेसबुकपेजवर सांगितलं आहे.

चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे. कृत्रिम घरट्यांचा पर्याय आता त्यांनीही स्वीकारला आहे. तेव्हा चिमण्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येकानं छोटं पाऊल उचला अशी विनंती तिनं केली आहे.