07 March 2021

News Flash

दूरची चित्रवाणी

भविष्यातील टेलिव्हिजन, त्यातील बदल आणि संभाव्यता याबाबत अशाच काही कलाकारांकडून व्यक्त झालेली ही दूरची चित्र‘वाणी’.

|| नीलेश अडसूळ

नुकताच ‘जागतिक दूरचित्रवाणी दिन’ म्हणजेच तुमच्या आमच्या परिचयाचा ‘वर्ल्ड टेलिव्हिजन डे’ होऊन गेला. यानिमित्तानं अनेकांनी शुभेच्छा, आशावादी संदेश, अनुभव आदींची देवाणघेवाण केली. समाजमाध्यमांवरही या दिवसाचं भरपूर कोडकौतुक होताना दिसलं, परंतु ओटीटीसारखं ताकदीचं माध्यम समोर उभं असताना ‘टेलिव्हिजन’चं भविष्य नक्की कसं असेल याचा वेध घेणं गरजेचे आहे. ओटीटीची कास धरलेले आतापासून टेलिव्हिजनकडे पाठ फिरवून इथे काही होणार नाही, अशा पाटय़ा झळकावून बसलेत. परंतु गेली काही र्वष निष्ठेनं तिथं काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ मात्र आजही या माध्यमाच्या उज्ज्वल वाटचालीसाठी प्रयत्नशील आहेत. अर्थात या माध्यमातील साचेबद्धतेत बदल करण्यासाठी तेही प्रयत्नशील आहेत. परंतु याला सर्व स्तरातून अनुमती मिळाली तर ते सत्यात उतरेल असं त्यांचं म्हणणं आहे. भविष्यातील टेलिव्हिजन, त्यातील बदल आणि संभाव्यता याबाबत अशाच काही कलाकारांकडून व्यक्त झालेली ही दूरची चित्र‘वाणी’.

टेलिव्हिजन म्हणजे कुटुंबातील व्यक्तीच..

|| सतीश राजवाडे लेखक-दिग्दर्शक

ओटीटीमुळे टेलिव्हिजनवर परिणाम होईल असं मला तरी वाटत नाही. पहिलं कारण म्हणजे टेलिव्हिजन हा आपल्यासाठी एखाद्या व्यक्तीप्रमाणंच आहे. दुसरं म्हणजे इथं प्रत्येकाला आवडेल असा आशय उपलब्ध आहे. तिसरी बाब म्हणजे टेलिव्हिजन तुम्ही संपूर्ण कुटुंबाबरोबर बसून पाहू शकता. संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारं हे माध्यम आहे. ओटीटीचं सामथ्र्य वेगळं आहे आणि टेलिव्हिजनचं वेगळं. दोन्हीही आपापला प्रेक्षकवर्ग घेऊन बरोबर चालले आहेत, त्यामुळे ओटीटीचा टेलिव्हिजनवर परिणाम होतोय असं अजिबात नाही. टेलिव्हिजनकडे स्वत:ची ताकद आहे. कदाचित हीच ताकद म्हणजे लोक ओटीटीवर जाऊनही मालिकांचे निसटलेले भाग पाहतात. आणि कालांतरानं इथलाही आशय बदलेल. कारण मनोरंजन हे बदलातून घडत असतं. जुने सिनेमे आणि आताचे सिनेमे यात फरक आहे. जुने नाटक आणि आताचे नाटक यात फरक आहे. परिणामी टेलिव्हिजनवरही हा बदल दिसून येईल. काम करणारी पिढी बदलली की विचार, कामाची पद्धत, आशय-विषय, कथा सांगण्याची पद्धत यातही बदल होत जातात. त्यामुळे कोणतेही माध्यम विशिष्ट साच्यात अडकत नाही. इथे काम करणारे कलाकार तर सर्व माध्यमात वावरत आहेत. विशेष म्हणजे दिग्गजांचाही टेलिव्हिजनकडे कल आहे, त्यामळे हे आजही तितकेच सशक्त माध्यम आहे.

दोन्ही माध्यमे टोकाचीच..

|| मधुगंधा कुलकर्णी, लेखिका-अभिनेत्री

टेलिव्हिजनला भविष्य नक्कीच आहे. कारण त्याची पोहोच महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत आहे. जे अद्याप ओटीटीला शक्य झालेले नाही. अर्थात टेलिव्हिजनमध्ये बदल होणे आवश्यकच आहे. प्रत्येक मालिका एक मुलगी, तिचा नवरा आणि सासर याच खुंटाभोवती फिरताना दिसते. किंबहुना आताच्या तुलनेने जुन्या मालिका अधिक आशयपूर्ण होत्या. जग बदलत चाललं आहे याची आपण दखल घ्यायला हवी. सध्याचं सामाजिक -राजकीय वातावरण वेगळं आहे, नात्यांचं स्वरूप वेगळं आहे. त्यानुसार विषय बदलायला हवे. कौटुंबिक आशय वगळून टाका असं अजिबात नाही, पण याही आशयाला स्थान मिळायला हवं. हे धाडस वाहिन्यांकडून झालं तर नक्कीच टेलिव्हिजनचं स्वरूप बदलेल. विशेष म्हणजे आपल्याकडे दोन्ही माध्यमं अगदी टोकाची आहेत. ओटीटीवर अतिरंजकता, अतिप्रणय, अतिहिंसक वातावरण असल्याने त्याही माध्यमाचा ठरावीक वेळेनंतर उबग येतो. अशा वेळी काहीतरी सात्त्विक पाहावं असं लोकांना वाटतं, परंतु टेलिव्हिजनवरही सात्त्विक ऐवजी कुटुंबनाटय़ाचा अतिरेकच सुरू असतो. ‘रजनी’, ‘वागळे की दुनिया’ आणि अशा कितीतरी आदर्श कलाकृती आपल्यापुढं आहेत. त्यामुळे दोन्ही टोकांचा सुवर्णमध्य साधता येईल असं काहीतरी हवं. आपण नव्या पिढीला काय आणि कोणती गोष्ट सांगतोय याचा विचार व्हायला हवा.

 

पारदर्शकता आणि आशयघन कथा महत्त्वाच्या

|| चिन्मय मांडलेकर, लेखक-दिग्दर्शक

टेलिव्हिजन टिकायचे असेल तर सर्वप्रथम त्याच्या मोजमापाच्या परिमाणात पारदर्शकता येणं आवश्यक आहे. अनेक र्वष टेलिव्हिजनवर काम करूनही टीआरपी कसा मोजला जातो, तो इतकाच कसा आला, काय कारणं असतील, याविषयी कुणीही स्पष्टता देऊ शकत नाही. परिणामी वाहिन्यांकडे चांगल्या कथा, विषय जाऊनही केवळ टीआरपीच्या गणितांमुळं नाकारल्या जातात. यात वाहिन्यांचा दोष आहे असं नाही, परंतु परिमाणातच पारदर्शकता नाही. याउलट ओटीटीवर तुम्हाला तुमचा प्रेक्षकवर्ग कळतो, त्यांचे प्रतिसाद कळतात. जेणेकरून आपल्यालाही अंदाज येतो नेमकं काय द्यायचं आहे. ‘चंद्र आहे साक्षीला’ या माझ्या नव्या मालिकेला वाहिनीपेक्षा ओटीटीवर जास्त प्रतिसाद आहे आणि हे मला ओटीटीमुळे कळू शकलं. कदाचित लोकांना आपल्या सोयीने, आवडीने टीव्हीसमोर जाणं जास्त श्रेयस्कर वाटत असेल. त्यामुळे प्रेक्षकांना इथे टिकून ठेवण्यासाठी नवा आशय, नवी मांडणी, काही साहित्यकृतींचा अभ्यास, कमी भागांच्या मालिका असे प्रयोग करायला हवे. जेणेकरून ठरलेला साचा मोडून टेलिव्हिजन पुढे जाईल. अन्यथा पुढच्या दहा वर्षांत टेलिव्हिजन नामशेष होण्याच्या मार्गावर येईल.

टेलिव्हिजनला धक्का लागणे अशक्य

|| मंदार देवस्थळी, दिग्दर्शक, निर्माते

एखादी नवीन गोष्ट बाजारात आल्यावर जुन्या गोष्टीवर त्याचा परिणाम होणारच. तसंच ओटीटीचंही आहे, परंतु तिथलं आर्थिक गणितही मोठं असल्याने मालिकांपेक्षा अगदी वरच्या दर्जाची आशयनिर्मिती त्यांना शक्य आहे. असं असलं तरी टेलीव्हिजनवरही चांगलाच आशय दाखवला जात आहे. मुळात टेलिव्हिजन हे केवळ तरुणाई नाही तर प्रत्येक वयोगटातील व्यक्ती पाहते. विशेष म्हणजे कुटुंबासमवेत बसून पाहतो. आपण आशयघन मालिका निर्माण केल्या तर लोक येणारच. म्हणूनच आजही मराठीत पाच वाहिन्या दिमाखात सुरू आहेत. ‘फुलपाखरू’सारखी माझी मालिका प्रत्येक वयोगटातील लोक पाहायचे आणि तरुणाईचाही उदंड प्रतिसाद होता. त्यामुळे टेलिव्हिजनला मरण नाही.

दोन्ही बाजूंचा विचार महत्त्वाचा

|| नितीन वैद्य, निर्माते

ओटीटीचे काही सकारात्मक तर काही नकारात्मक परिणाम आहेत. परंतु ओटीटीमुळे टेलिव्हिजनच्या गणितावर तीळमात्र परिणाम झालेला नाही. ओटीटीवर आशय पाहणे म्हणजे तुमच्याकडे चांगले मोबाइल हवे, घरात उत्तम दर्जाचे वायफाय हवे, इंटरनेट सुविधा हवी. आणि सध्या तरी हे सर्वसामान्य कुटुंबांना परवडणारे नाही. ओटीटी पाहण्यासाठी तुमचा सांस्कृतिक स्तरही उंचावणे गरजेचं आहे. तिथं दाखवला जाणारा आशय आपल्या घरांमध्ये पचवला जाऊ शकत नाही. अर्थात ओटीटीनं अभिरुचीसंपन्न आशय, कथेची मांडणी, सादरीकरण फारच वरच्या दर्जावर नेऊन ठेवली आहे. साहित्यकृतींचा अभ्यास, विविध स्तरातील विषयांना हात घालण्याचे काम ओटीटीनं केलं. त्यामुळे अशा धाटणीचा परंतु सर्व जण पाहू शकतील असा आशय आपल्याला टेलिव्हिजनवर आणणे गरजेचे आहे. मालिकांमधल्या कौटुंबिक दळणाला निर्माते आणि वाहिन्या दोघेही जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनीच एकत्र येऊन मर्यादित स्वरूपाचे आणि चांगल्या आशयाचे कार्यक्रम आणायला हवे. असाच ‘रुद्रकाल’ नावाचा केवळ २६ भागांचा एक कार्यक्रम मी ‘स्टार’ सोबत करतो आहे.

भविष्यासाठी प्रेक्षक मिळवण्याची गरज..

|| विभावरी देशपांडे, अभिनेत्री, लेखिको

टेलिव्हिजनवर मी अभिनेत्री म्हणून काम केलं नसलं तरी लेखिका म्हणून गेली दहा र्वष कार्यरत आहे. आपल्याकडे ओटीटीचं प्रस्थ वाढण्यामागे हातोहाती आलेले स्मार्ट फोन, इंटरनेट अशी काही कारणं आहेत. त्यात नवीन आलेल्या माध्यमाकडे लोकांचा ओढा अधिक असणं स्वाभाविक आहे. परंतु ओटीटीचं समीकरण टेलिव्हिजनपेक्षा पूर्णत: वेगळं आहे. कौटुंबिक जिव्हाळा, स्त्री-पुरुष नाते, चुलीपुढचे राजकारण असले नियोजित ठोकताळे तिथे नाहीत. अर्थात असा आशय पाहणाराही मोठा वर्ग आहे तो पुढेही कायम असेल. परंतु लोकांना हाच आशय आवडतो, की याही पलीकडचं काही पाहायला आवडतं हे तपासून बघायची आज गरज आहे. किंबहुना लोकांना वेगळ्या धाटणीच्या कथा बघायला आवडतात हे ओटीटीनं सिद्ध केलं आहे. प्रत्येक माध्यमाचा ठरलेला वयोगट असला तरी टेलिव्हिजननं आशयात, मांडणीत काही बदल केले तर दूर गेलेली तरुणाईही परत येईल. कारण मराठीचा आग्रह असणाऱ्यांसाठीही आता ओटीटीवर बराच आशय येतो आहे. त्यामुळे भविष्यात टिकून राहण्यासाठी प्रेक्षक मिळवण्याची टेलिव्हिजनला गरज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 2:36 am

Web Title: world television day 2020 mppg 94
Next Stories
1 ‘परंपरा आणि नावीन्य दोन्ही जपणं हीच यश चोप्रांची खासियत’
2 छोटय़ांवर मोठी मदार
3 Video : ‘हे अत्यंत वेदनादायी’; सुशांतशिवाय परफॉर्म करताना अंकिता भावूक
Just Now!
X