News Flash

आवाज आमची ओळख!

कलाकारांच्या आवाजाचा कानोसा घेणारा हा शब्दप्रपंच..

निलेश अडसूळ

‘आवाज’.. म्हटले तर काहीच नाही आणि म्हटले तर सर्व काही; पण सर्व काही म्हणणेच जास्त श्रेयस्कर ठरेल आणि ‘काहीच नाही’ म्हणण्यामागचं कारण आपल्याकडे अजूनही आवाजाला फारसे महत्त्व दिले जात नाही किंवा आवाजावर काम करणे, आवाज जपणे, आवाजाचा उपयोग उदरनिर्वाहासाठी करणे हे जरा क्वचितच आढळते. म्हणूनच कदाचित ‘जागतिक आवाज दिन’ आपल्याकडे फारसा साजरा होताना दिसत नाही. किंबहुना ‘१६ एप्रिल’ हा जागतिक आवाज दिन म्हणून ओळखला जातो हेही अनेकांना माहिती नसेल. नुकत्याच होऊन गेलेल्या या आवाज दिनाचे औचित्य साधून अशा काही चेहऱ्यांशी आपण बोलणार आहोत, ज्यांची चेहऱ्यासोबतच ‘आवाज’ हीदेखील ओळख झाली आहे. आता ‘आवाज’ आणि ‘ओळख’ हे संगीत क्षेत्रातील अविभाज्य समीकरण आहेच, पण नाटय़-चित्रपट क्षेत्रांतही आवाजातील वेगळेपणामुळे अनेक तारे-तारकांचा ‘आवाज’ ही ओळख झाली आहे. अशाच काही कलाकारांच्या आवाजाचा कानोसा घेणारा हा शब्दप्रपंच..

‘ ही तर साधना..’

आवाज हा कलाकारांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विशेष करून नाटक करताना आवाजाचा खरा कस लागतो.  आपल्याकडे पहिल्या काही रांगांनाच नाटक स्पष्ट दिसते आणि ऐकू येते. मागचे प्रेक्षक आवाज आणि कायिक अभिनयाचे नाटक पाहात असतात. तर बाल्कनीतला प्रेक्षक हा केवळ स्वरांच्या कंपनातून पोहोचणाऱ्या आवाजावर नाटक अनुभवत असतो. त्यामुळे आवाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अभिनय हे शरीर, डोळे, आवाज यांचे मिश्रण आहे. त्यातही आवाज आपलाच असला तरी प्रत्येक भूमिकेला लागणारा आवाज वेगळा आहे. ‘चारचौघी’मध्ये कणखर आवाज, ‘सोनचाफा’मध्ये मृदू, ‘सुंदर मी होणार’मध्ये आजारी नायिका, पण कविमनाची, त्यामुळे आवाजातली तरलता हे ठेहराव जपता आले पाहिजेत. माझा मूळचा आवाज कणखर असल्याने ‘सुंदर मी होणार’ हे नाटक मी आव्हान म्हणून स्वीकारले. कलाकाराची स्वरांवर हुकमत असायला हवी. आपल्या भावनेतून भिजून ते बाहेर पडायला हवे, ही शिकवण आईकडून मिळाली. लावणी, अभंग, भावगीत या प्रत्येक प्रकारात आईचा आवाज वेगळा असायचा. हल्ली प्रत्येक जण आवाज उठवायच्या मार्गावर आहे. त्यापेक्षा तो कसा पोहोचवता येईल याचा विचार व्हायला हवा. प्रत्येक भूमिकेच्या आवाजाचा मी अभ्यास करते. ते पात्र कसे बोलेल, त्याची लय काय असेल, यांचा अंदाज घेऊन मी काम करते. ‘चारचौघी’ नाटकात ‘आई काय म्हणतेय ही’ या एका वाक्याला लोकांनी हजारो प्रयोग टाळ्या दिल्या आहेत. त्यामुळे आवाज हा तुम्हाला शब्दांच्या पलीकडचे भाव मांडायला शिकवतो.

– वंदना गुप्ते

‘स्वतंत्र जग’

हल्लीची तरुण मंडळी आवाजावर लक्ष देऊन अभिनय करताना दिसत आहेत. ‘व्हॉइस कल्चर’चे काम दिवसेंदिवस वाढते आहे. वेब मालिका आणि सिनेमांचे दर्जेदार डबिंग यामुळे आवाजाला महत्त्व प्राप्त झाले आहे. नट म्हणून रंगभूमीवर आवाज महत्त्वाचा आहेच, पण त्याही पलीकडे कॅमेरासमोर काम करताना आवाजाचे मोठे आव्हान नटापुढे असते. डबिंग होणार नसेल तर कसा आवाज हवा आणि डबिंग करताना कसा आवाज हवा यातही फरक आहे. दृश्य चित्रित झाल्यानंतर डबिंग करताना आवाजातले सातत्य, जरब, भाव त्याच आर्ततेने पोहोचवावे लागते. आकाशवाणीपासून झालेली सुरुवात आज हॉलीवूड सिनेमांमध्ये आवाज देण्यापर्यंत पोहोचली. आवाज किती महत्त्वाचा आहे आणि त्यात किती काम करता येऊ शकते हे मला आकाशवाणीत समजले. पुढे ‘जंगल बुक’ कार्टूनसाठी आवाज दिला आणि नव्या वाटा खुल्या झाल्या. पुढे अविनाश नारकरमुळे डबिंगमध्ये काम करू लागलो आणि करिअर समृद्ध होत गेले. आवाज हे एक स्वतंत्र जग आहे. अभिनयातही तुम्ही जे काही करत असता त्यातला पन्नास टक्के  वाटा आवाजाचा असतो. मागे नेटफ्लिक्सच्या ‘दिल्ही क्राइम’साठी आवाज दिला, तिथल्या लोकांनीही भरभरून कौतुक गेले. विशेष म्हणजे अंध मुलांची पुस्तके माझ्या आवाजात रेकॉर्ड केली गेली. आज नेत्रहीन मित्रांकडून त्याची पावती मिळते तेव्हा पराकोटीचे समाधान मिळते. गेल्या टाळेबंदीत ‘ये क्या लफडा हो गया है’ अशी एक टाळेबंदीवर आधारित चित्रफीत केली होती. ती पाहून जगभरातून मला फोन आले आणि तिथल्या स्थलांतरितांनी मुंबईविषयी आपुलकी व्यक्त केली. तीच चित्रफीत स्वामिनारायण मंदिरात देवापुढे ऐकवली गेली. त्यामुळे लोकांच्या भावनांना हात घालण्याची ताकद आवाजामध्ये आहे. त्यामुळे आपला आवाज ओळखून त्यावर काम करायला हवे.

– उदय सबनीस

‘आवाजावर बरेच काही’

अभिनय क्षेत्रात आवाजावर बरेच काही अवलंबून आहे. केवळ भारदस्त वेशभूषा, केशभूषा करून उभे राहिलात आणि तुमचा आवाजच त्या भूमिकेला न्याय देत नसेल तर ती भूमिका व्यर्थ ठरते. अगदी वैयक्तिक आयुष्यातही गर्दीतून जात असताना लोक माझ्या आवाजाने मला ओळखतात ही समाधान देणारी गोष्ट आहे. कलाकाराकडे आवाज आणि शरीर ही दोन महत्त्वाची शस्त्रे आहेत. अर्थात ती पात्राप्रमाणे बदलत जायला हवी. पात्राचे वय, कार्य, प्रांत यांचा अभ्यास करून आपल्या मूळ आवाजाला आकार द्यावा लागतो. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’मधला आवाज एका साध्या गृहिणीचा, ‘लापतागंज’मध्ये अनुनासिक स्वरात बोलणारी मौसी, ‘राजा रानीची गं जोडी’मध्ये शिस्त आणि घराणेशाही पाळणाऱ्या आईसाहेब, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मध्ये एका उद्योगाची मालकीण तरीही मातृत्व आणि तरलता जपणारी हे आवाजाचे वेगवेगळे टप्पे मी साध्य केले. ते करण्यासाठी प्रत्येक भूमिकेच्या आवाजाचा अभ्यास करावा लागतो. लहानपणी सुरांची ओळख झाल्याने आवाजात बदल करणे किंवा त्यावर काम करणे अधिक सोपे जाते; पण आवाजाची दुनिया ही एक जादू आहे. म्हणजे बातमीदारही ज्या पद्धतीने बातमी देतो त्यावरून आपल्याला बाहेरच्या जगात घडलेल्या गोष्टींचे गांभीर्य कळते. मुक्या प्राण्यालाही आवाज असतो आणि आपला आवाज त्याला कळतोही. त्यामुळे प्रत्येकाने आपला आवाज जपायला हवा, त्यावर काम करायला हवे. त्यासाठी वेगवेगळी गीते ऐकायला हवी, त्यातील सूर, ताल, भाव समजून घेताना आपलाही आवाज बहरत जातो.

– शुभांगी गोखले

‘आवाजाचा अपव्यय टाळावा’

माझी सुरुवात बालनाटय़ आणि अभिनय क्षेत्रातून झाली असली तरी पुढे ‘आवाज’ या क्षेत्रात मी पुढे गेले. सध्या आवाजाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. माझ्यासाठी तर माझा आवाजच माझी ओळख आहे. गेली तीस वर्षे या क्षेत्रात मी कार्यरत आहे. तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, इतर भाषेतील कलाकृती आपल्याला आपल्या भाषेत पाहता येतात, समजून घेता येतात. अशा वेळी डबिंग करण्यासाठी चांगल्या आवाज देणाऱ्या कलाकारांची गरज असते. कारण त्या पात्राला शोभेल असा समर्पक आवाज दिला तर ते डबिंग वाटत नाही, अन्यथा प्रेक्षकांना कृत्रिम आवाजाचा अंदाज येतो. रेडिओ हे तर आवाजाचे स्वतंत्र माध्यम आहे जिथे बोलणारा माणूस कधीही दिसत नाही तरीही त्याच्या सांगितलेल्या गोष्टी आपल्याला आपल्या वाटतात. कदाचित आवाजामुळेच माणूस इतर प्राणिमात्रांपासून वेगळा ठरला आहे; पण आवाज आहे म्हणून तो कसाही वापरला जातो जे अत्यंत गैर आहे. घरातही आपण एका खोलीत बसून दुसऱ्या खोलीत असलेल्या व्यक्तीला ओरडून साद घालत असतो. त्या वेळी अशा ओरडण्याची गरज नसते, पण आपल्याला आवाजाचा अपव्यय करायची सवय झाल्याने सार्वजनिक ठिकाणीही आपण हवा तसा आवाज लावतो. हे शक्यतो टाळले पाहिजे, कारण ही दैवी देणगी आहे. त्यामुळे आवाज जपला पाहिजे. त्याला शब्दांची, वाचनाची जोड देऊन गोडवा वाढवायला हवा. हे क्षेत्र वाटते तितके सोपे नाही. केवळ आवाज असून हे जमणार नाही, तर आवाजावर ताबा, भाषेवर प्रभुत्व, भावनेनुसार त्यात बदल, अशा बऱ्याच गोष्टींत मेहनत घ्यावी लागते. ती घेण्याची तयारी असेल तर हे ‘आवाज’ हे क्षेत्र करिअरसाठी खुले आहे.

– मेघना एरंडे

‘ ही देणगीच’

माझा आवाज वेगळा आहे, ही मला मिळालेली देणगी समजतो मी. लोक जेव्हा म्हणतात- तुमचा आवाज दमदार आहे, तेव्हा आवाजातील वेगळेपणाबाबत मला जाणीव होते. आजवर नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमांत काम करताना मी केवळ भूमिका समजून काम केले आणि त्यानुसार आपोआप तसा आवाज लागत गेला. माझा आवाज माझ्यापेक्षा लोकांना जास्त परिचित झाला आहे असे वाटते, कारण आजही तोंडावर मुखपट्टी, डोक्यावर टोपी असतानाही लोक केवळ आवाजावरून मला ओळखतात; पण हा आवाज मला उपजत मिळालेला आहे, त्यावर मी कधीही काम केले नाही. जेव्हा समोरचा माणूस न सांगता आपला आवाज ओळखतो तेव्हा आनंद होतो. बऱ्याचदा आवाजातील जरबेने लोकांना भीतीही वाटते. ‘अगं बाई सुनबाई’ मालिकेत आमच्या लहानग्या पणतूला कधी तरी सहज एखादी गोष्ट समजावतानाही त्याला भीती वाटते. माझा आवाज जरा वर-खाली झाला की त्याचे हावभाव बदलतात. मग मला त्याची समजून काढावी लागते. किंबहुना माझ्या आवाजाने माझी नातवंडेही धाकात राहतात. मी माझ्या वाटय़ाला आलेल्या भूमिका प्रामाणिकपणे करत गेलो आणि त्यातूनच हा आवाज बहरला असावा असे मला वाटते.

– मोहन जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 3:08 am

Web Title: world voice day different voice of the star in the field of drama film zws 70
Next Stories
1 अजब प्रेमाच्या गजब गोष्टी
2 “..म्हणून मी बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही”; या अभिनेत्रीने केला खुलासा
3 प्रियांका चोप्रा लाँच करणार कबीर बेदींचे आत्मचरित्र
Just Now!
X