देशाचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी मिळतीजुळती शरीरयष्टी आणि कसदार अभिनयाची ताकद असल्याने कलाम यांच्या भूमिकेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी न्याय देऊ शकतो, अशी चर्चा बॉलीवूड वर्तुळात होती. नवाजुद्दीन देखील अब्दुल कलाम यांची भूमिका साकारण्यासाठी तयार झाल्याचे वृत्त समोर आले होते. पण खुद्द नवाजुद्दीनने कलाम यांच्यावरील चित्रपटासाठी अद्याप आपल्याला कोणतीच विचारणा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

‘रमन राघव २.०’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी तो बोलत होता. कलाम यांच्यावरील चित्रपटात मुख्य भूमिकेबाबतच्या वृत्तावर बोलताना नवाजुद्दीन म्हणाला की, मला अद्याप कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही. पण कलाम यांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळालीच तर मी मोठ्या अभिमानाने स्विकारेन. इतक्या मोठ्या व्यक्तीची भूमिका साकारण्यास मला नक्कीच आनंद होईल.

पाहा: रमन राघवचा ट्रेलर; नवाजुद्दीनचा अंगावर काटा आणणारा अभिनय

नवाजुद्दीनने आपल्या चित्रपटातून केवळ प्रेक्षक नाही तर अनेक बॉलीवूडकर आणि चित्रपटातील सहकाऱयांचीही मने जिंकली आहेत. नुकतेच महानायक अमिताभ बच्चन यांनी TE3N चित्रपटात नवाजुद्दीनने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक केले होते. TE3N या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबतच नवाजुद्दीनची देखील महत्त्वाची भूमिका आहे. बिग बींनी दिलेली कौतुकाची थाप आपल्यासाठी खूप महत्त्वाची असल्याचे नवाजुद्दीन म्हणाला. TE3N चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी मी पुण्यात चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे मला उपस्थित राहता आले नव्हते. पण अमिताभ बच्चन यांच्यासारख्या मोठ्या कलाकाने माझे कौतुक केले यापेक्षा आणखी वेगळ मला काय हवं, असे नवाजुद्दीन म्हणाला.