‘चूकभूल ..’ निरोप घेणार

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने पांडूला म्हणजेच लेखक-अभिनेता प्रल्हाद कुडतरकर याला घराघरांत लोकप्रिय केले. याच मालिकेमुळे मालवणी भाषा आणि कोकणचे गाव, माणसे, संस्कृती या गोष्टींना टीव्हीच्या विश्वात पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले. आता पुन्हा एकदा तीच कोकणी माणसे आणि त्यांच्या गजाली घेऊन लेखक प्रल्हाद कुडतरकरची नवीन मालिका ‘झी मराठी’वर लवकरच दाखल होते आहे. सध्या सुरू असलेली ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्या जागी ‘गाव गाता गजाली’ ही नवीन मालिका दाखल होते आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘हंड्रेज डेज’ या मालिकेचे निर्माता संतोष कणेकर यांनीच ‘गाव गाता गजाली’ची निर्मिती केली आहे. तर या गजाली लिहिण्याची आणि अभिनयातून पोहोचवण्याची दुहेरी जबाबदारी या मालिकेतही प्रल्हाद कुडतरकर पेलताना दिसणार आहे, तर दिग्दर्शन राजू सावंत यांनी केले आहे. कोकणी माणसांचा स्वभाव मुळातच गप्पिष्ट. चार मंडळी जमवून गप्पा छाटत बसणे हा कोकणी माणसांचा आवडता उद्योग. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बोलल्या जाणाऱ्या मालवणी भाषेत या गप्पांनाच ‘गजाली’ असे म्हटले जाते. या गप्पांमध्ये गावातील भानगडी ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत सगळे विषय असतात. ‘काय रे बाबल्या आसय खय, दिसाक नाय बरेच दिस. आसय खय म्हणजे काय तात्यानू. मीया जातलंय खय? हयसरच आसय. सध्या माका वेळच नाय’, असे म्हणून गप्पांना सुरुवात होते आणि या गप्पा कितीही वेळ सुरू राहतात. याच कोकणी माणसाच्या या गजाली आता ‘झी मराठी’वरून पाहायला मिळणार आहेत.

इरसाल माणसांच्या इरसाल गजालींची ‘गाव गाता गजाली’ ही नवी मालिका येत्या २ ऑगस्टपासून ‘झी मराठी’वरून प्रसारित होणार आहे. बुधवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता ‘गाव गाता गजाली’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून मालवणी भाषा लोकप्रिय झाली तसेच कोकणातील आकेरी हे गाव पर्यटकांच्या खास आकर्षणाचा केंद्रबिंदू झाले होते. आता ‘गाव गाता गजाली’ या मालिकेच्या निमित्ताने कोकणातील निसर्गरम्य मिठबाव हे गाव ‘झी मराठी’च्या पडद्यावर झळकणार आहे. ‘गजाली’ हा खास कोकणातला शब्द आहे. कोकण म्हटले की कोकणातली इरसाल माणसे आणि त्यांचे नमुने पाहायला मिळतात. आजही अशी माणसे कोकणातील गावागावांमधून आहेत. अशाच काही माणसांचे नमुने या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.

गावात कळीचा नारद असलेला वामन, देवांशी बोलणारा आबा, सासू-सुनेच्या भांडणात कोंडी होणारा नवरा, गावाला थापा मारणारा सुहास आहे आणि त्याला जेरीस आणणारा त्याचा मुलगा क्रिश, लपूनछपून प्रेम करणारे प्रसाद व हेमा, गावाचा सरपंच होण्याची स्वप्ने बघणारा रिक्षावालाही यात आहे. ही माणसे एकमेकांशी कडाडून भांडणारी तितकीच जिवाला जीव देणारीही आहेत. प्रत्येकाची स्वप्ने वेगळी, त्यांचे स्वभाव वेगळे आहेत. ही सर्व माणसे आता प्रेक्षकांसमोर येणार आहेत.