प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे गुरुवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली. ऑक्टोबर महिन्यात त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारण झाली नाही. अखेर त्यांचे सर्वात जवळचे मित्र ख्यातनाम चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी त्यांना स्वतःच्या घरी नेले.

दिग्दर्शक, अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन

नीरज व्होरा यांच्या वडिलांचे २००५ मध्ये निधन झाले. तर २०१४ मध्ये त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले होते. तर त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. त्यामुळे आजारी पडल्यानंतर त्यांचा सांभाळ करायला कुणीही नव्हते. तेव्हा फिरोज यांनी त्यांची संपूर्ण जबाबदारी उचलली. नीरज लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून फिरोज यांनी त्यांच्या घरातील एका खोलीत आयसीयू कक्ष तयार करवून घेतला होता. त्यांच्या देखभालीसाठी एक वॉर्ड बॉय, नर्सही नेमण्यात आली होती. तसेच दर आठवड्याला फिजियोथेरेपिस्ट, न्यूरो सर्जन, अॅक्यूपंक्चर थेरेपिस्ट आणि फिजिशियन त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून मेहनत करत होते. नीरज यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणाही दिसून येत होती. पण आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.