24 April 2019

News Flash

प्रियांका ‘ग्लोबल स्कॅम आर्टिस्ट’, ‘द कट’मध्ये वादग्रस्त लेख, टीकेनंतर मागितली माफी

केवळ स्वत:च्या फायद्यासाठी प्रियांकानं वयानं लहान असलेल्या निकशी लग्न केलं. निकला तिनं स्वत:शी लग्न करण्यास भाग पाडलं असं या लेखात म्हटलं आहे.

प्रियांका चोप्रा- निक जोनास

‘ग्लोबल स्टार’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हे दोघंही गेल्याच आठवड्यात विवाहबंधनात अडकले. या जोडप्यावर जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्यांच्याबद्दल ‘द कट’ या मासिकात प्रकाशित झालेल्या एका लेखावरून मोठा वाद सोशल मीडियावर निर्माण झाला आहे. प्रियांका आणि निक यांच्या नात्यावर या लेखातून आक्षेपार्ह टीका करण्यात आली असून प्रियांका उल्लेख लेखिकेनं ‘ग्लोबल स्कॅम आर्टिस्ट’ असा केला आहे. प्रियांकानं निकला त्याच्या इच्छेविरुद्ध लग्न करायला भाग पाडलं असा थेट आरोप लेखिका मारिहा स्मिथनं केला आहे.

‘Is Priyanka Chopra and Nick Jonas’s Love for Real?’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या लेखात लेखिका मारिहा स्मिथनं आक्षेपार्ह भाषा वापरत निक आणि प्रियांकाच्या लग्नावर टीका केली आहे. प्रियांका ही ग्लोबल स्टार नसून ती ग्लोबल स्कॅम आर्टिस्ट आहे. तिनं केवळ स्वत:च्या फायद्यासाठी आणि हॉलिवूडमध्ये आपलं बस्तान बसवण्यासाठी निक जोनासशी लग्न केलं. निक, ज्यो, सोफी टर्नर हे ग्लोबल स्टार आहेत यांच्याशी नातं जोडून तिला स्वत:चा फायदा करून घ्यायचा होता म्हणूनच तिनं स्वत:पेक्षा वयानं १० वर्षे लहान असलेल्या निकला आपल्या जाळ्यात अडकवलं अशा प्रकारची टीका स्मिथ यांनी आपल्या लेखातून केली.

‘निकला प्रियांकाशी लग्न करण्यात रस नव्हता, मात्र प्रियांकानं त्याच्या मनाविरुद्ध जाऊन त्याला स्वत:शी लग्न करण्यास भाग पाडलं. हे लग्न म्हणजे केवळ या जोडप्यासाठी पैसे कमावण्याचा इव्हेंट होता. हा लग्नसोहळा म्हणजे या जोडप्यासाठी अतिरिक्त कमाई करण्याचं साधन होतं. लग्नाचे फोटो विकून त्यांनी ते सिद्धही केलं. प्रियांका जे काही बोलते तो केवळ दिखावा असून तिच्या करिअरसाठी ती सारं करत असते असंही या लेखात म्हटलं होतं, याव्यतिरिक्तही अनेक आक्षेपार्ह टीका या लेखातून करण्यात आल्या होत्या.

हा लेख प्राकशित झाल्यानंतर अल्पावधितच मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ‘द कट’ मासिकावर टीका करण्यात आली. अभिनेत्री सोनम कपूर आहुजा, सोफी टर्नर, स्वरा भास्कर यांसारख्या अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या लेखावर नाराजी व्यक्त केली आहे.

स्मिथ यांच्याजवळ असलेली अपुरी माहिती, चुकीचा दृष्टीकोन आणि मनात आकस ठेवून हा लेख लिहिला आहे असं सर्वांचचं म्हणणं आहे. जगभरातून मासिकावर टीका होऊ लागल्यानं या मासिकानं लेख आपल्या वेबसाइटवरून काढून टाकला आहे. लेखातील विचार हे मासिकाचे नसून ते स्मिथ यांचे आहेत. तरीही लेखातून वाचकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे आम्ही सर्वांची माफी मागतो आणि हा लेख काढून टाकत आहोत असं मासिकानं म्हटलं आहे.

 

या वादावर स्मिथनं कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

First Published on December 6, 2018 10:27 am

Web Title: writer mariah smith accused priyanka chopra of being a global scam artist the cut issue an apology