अनेक दिवसांपासून ‘ट्रिपल एक्सः रिटर्न ऑफ झेंडर केज’ याच सिनेमाची चर्चा होती. २००२ मध्ये सुरु झालेल्या ‘ट्रिपल एक्स’ या सिनेमाचा हा तिसरा भाग. २००५ मध्ये ‘ट्रिपल एक्सः स्टेट ऑफ दि युनियन’ हा सिनेमा आला होता. २००५ नंतर येणारा ‘ट्रिपल एक्सः रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा सिनेमा खूप अपेक्षा घेऊन येणारा आहे. या सिनेमाचे खास आकर्षण म्हणजे बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण. सुमारे १२ वर्षांनी आलेल्या या सिनेमाचा तिसरा भाग आणि त्यातही भारतीय अभिनेत्री त्यामुळे भारतात या सिनेमाबद्दल अधिकच उत्सुकता दिसून येते. या सिनेमात आवर्जून जाणवणारी गोष्ट म्हणजे दीपिकाची खास भारतीय शैलीत इंग्रजी बोलण्याची पद्धत. त्यामुळे भारतीय प्रेक्षक या सिनेमाशी पटकन जोडला जातो. याचे श्रेय नक्कीच दीपिकाला जाते. याशिवाय, हा सिनेमा अॅक्शनपॅक्ड असल्यामुळे यामध्ये दीपिका चाकू चालवताना, ग्रेनेड फेकताना, सहजरित्या बंदुक चालवताना आणि मारामारी करताना दिसते. एकुणच दीपिकाच्या आतापर्यंतच्या सिनेमांपेक्षा ट्रिपल एक्समधील तिचा अंदाज पूर्णपणे वेगळा आहे.

आधीच्या भागांप्रमाणेच या भागातही चुक विरुद्ध बरोबर, योग्य विरुद्ध अयोग्य अशाच गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. आधीच्या भागाप्रमाणेच या भागातही बाइकवरुन केलेला पाठलाग, हवेत केलेले स्टंट, पाण्यात केलेले स्टंट, मारामारी यांचा भरणा आहे. मुळात हिच ट्रिपल एक्स या सिनेमाची ओळख आहे. त्यामुळे ज्यांना अॅक्शनपॅक सिनेमे आवडतात त्यांच्यासाठी हा सिनेमा अगदी योग्य आहे. पण सिनेमाची कथा भरकटताना दिसते. सरकारची एक महत्त्वाची वस्तू काही चोर चोरुन घेऊन जातात. त्या चोरांना पकडण्यासाठी सरकार झेंडरची (विन डिझेल) निवड करतात. पण मग कथानक पुढे सरकत जाते तसे खलनायक नक्की कोण आहे, ते खलनायक मित्र कसे बनतात आणि सरकारच खलनायक कसे बनते याचे काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत हा सिनेमा साधारणतः दोन तासात संपतो. सिनेमा पाहताना अनेक ठिकाणी तर्क आणि बुद्धीला सोडचिठ्ठी देणे श्रेयस्कर ठरते.

Walnuts
तुम्ही रोज सकाळी अक्रोड खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे
Rashmika Mandanna on Deepfake Viral Video Marathi News
‘डीपफेक’ व्हिडिओ मध्ये रश्मिका मंदाना?.. बनावट व्हिडिओ कसे ओळखाल?
‘ट्रिपल एक्स’ विन डिझेलचा ‘ब्लडशॉट’
Video : दीपिकाने शेअर केला तिच्या पहिल्या हॉलिवूडपटाचा टिझर

साधारणतः दोन तासांच्या या सिनेमाचा पूर्वार्ध काहीसा संथ वाटतो. मात्र, उत्तरार्धात सिनेमाने चांगली पकड घेतल्याचे दिसून येते. सिनेमाची कथा, संगीत, स्टंट या सर्वांमध्येही संपूर्ण सिनेमात प्रेक्षकांचे लक्ष दीपिका पदुकोण आणि विन डिझेल यांच्यावरुन हटत नाही हे मात्र खरे. ज्यांना ट्रिपल एक्सचे पहिले दोन भाग आवडले असतील त्यांना हा भाग नक्कीच आवडेल. मात्र, उत्तम कथानकाची अपेक्षा धरून सिनेमा पाहायला गेलेल्यांच्या पदरी निराशाच पडेल.

सिनेमाचे नावः ट्रिपल एक्सः रिटर्न ऑफ झेंडर केज
दिग्दर्शकः डी. जे. कॅरुसो
कलाकारः विन डिझेल, दीपिका पदुकोण, रुबी रोस, सॅम्युअल एल जॅक्सन, डॉनी येन आणि टोनी जा
– मधुरा नेरुरकर