|| रवींद्र पाथरे

पंचवीसेक वर्षांपूर्वी लेखक-दिग्दर्शक-अभिनेते संतोष पवार यांनी आयएनटी एकांकिका स्पर्धेत ‘यदा कदाचित’ ही एकांकिका सादर केली होती. तिला स्पर्धेत सर्वोत्तम यश लाभलं नसलं तरी प्रेक्षकांना मात्र ही मॅड कॉमेडी खूप आवडली  होती. साधारणत: कॉमेडी म्हटलं की स्पर्धेच्या परीक्षकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण हा ‘काय हे?’ छापाचा असतो. त्यामुळे स्पर्धेत बक्षिसं मिळवायची असतील तर गंभीर विषयावरील एकांकिकाच सादर करणं आवश्यक आहे असा चुकीचा संदेश तरुण रंगकर्मीमध्ये गेला आहे. परिणामी विनोदी एकांकिका स्पर्धेत सादर करण्याचं धाडस युवक करेनासे झाले आहेत. गंभीर एकांकिकेत फार तर विरंगुळ्यासाठी एखाद् दुसरा विनोदी प्रसंग टाकणं त्यापेक्षा बरं- असा समज त्यामुळे फैलावतो आहे. मराठी रंगभूमीच्या सुदृढ वाटचालीच्या दृष्टीनं ही निश्चितच धोकादायक बाब आहे. (अर्थात व्यावसायिक रंगभूमी ही धंदेवाईक निर्मात्यांनी व्यापलेली असल्याने त्यांचा बहुश: कल ‘कथित’ विनोदी नाटकं करण्याकडेच असतो, ही गोष्ट वेगळी!) असो. तर सांगायची गोष्ट म्हणजे त्यावेळी ‘यदा कदाचित’ला अपेक्षित यश मिळालं नव्हतं तरी नंतर ही एकांकिका नाटकाच्या स्वरूपात मुख्य धारेत सादर केली गेली तेव्हा प्रेक्षकांनी ते प्रचंड डोक्यावर घेतलं. इतकं, की त्याचे गावोगावी तुफानी प्रयोग करताना कलाकारांची दमछाक झाली. पुढे या नाटकाचं ‘आधुनिकोत्तर नाटक’ (पोस्ट मॉडर्न प्ले) म्हणून विश्लेषण केलं गेलं. त्यातली रामायण-महाभारतकालीन तसंच समकालीन पात्रांची सरमिसळ हे त्याच्या ‘पोस्ट मॉडर्न’ रूपाचंच द्योतक असल्याची मांडणी केली गेली. कशाशी देणंघेणं नसलेल्या आधुनिकोत्तर काळाचं प्रतिबिंब या नाटकात आहे असा अन्वय लावण्यात आला. संतोष पवार यांची बहुतेक नाटकं याच पठडीतली आहेत. प्रेक्षकांचं चार घटका मनोरंजन करणं हाच आपला प्रधान हेतू असल्याचं संतोष पवार कसलाही आडपडदा न ठेवता नेहमी सांगतात. त्यातून जाता जाता सामाजिक संदेश देता आला तर चांगलंच, असं त्यांचं म्हणणं. नाटकाच्या शेवटी आवर्जून ते असा काहीएक संदेश द्यायचा प्रयत्न करतात. परंतु त्याआधीची मनोरंजनाची मात्रा अधिक झाल्याने प्रेक्षक तो फारसा मनावर घेत नाहीत, इतकंच. तर ते असो.

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

तर.. आता संतोष पवार पुनश्च ‘यदा कदाचित रिटर्न्‍स’ नावाने या नाटकाचा दुसरा भाग घेऊन आले आहेत. नावावरून ते जुनं नाटक पुन्हा आलंय की काय असं वाटतं, पण तसं नाहीए. मूळ ‘यदा कदाचित’शी याचा काहीही संबंध नाहीए. हे स्वतंत्र नाटक आहे. पवार यांनी यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला आहे. अर्थात नेहमीप्रमाणे हे आपल्याला शेवटाकडेच कळतं. संतोष पवार यांनी या नाटकात वैविध्यपूर्ण काळातली पात्रं एकत्र आणली आहेत. ‘बाहुबली’ चित्रपटातील बाहुबली व कटप्पा, महाभारतकालीन बाबाश्री, आयेश्री, देवसेना, भल्लालदेव, शिशुपाल, शिवाजीराजांच्या काळातील शाहिस्तेखान, ‘चांदोबा’ मासिकातील वेताळ, अकबराच्या दरबारातील बिरबल, वर्तमानकाळातील शांताबाई, पाकिस्तानी क्रिकेटपटू, न्यायदेवता वगैरे पात्रांची पंचरंगी भेळ पवार यांनी यात पेश केली आहे. आता या मंडळींना घेऊन नाटक करायचं तर त्याला नावापुरतं का होईना, कथानक हवं. त्याकरता कौरव-पांडवांमध्ये राज्यावरून झालेलं भांडण फोडणीगत घेतलंय. नाटकात दोन भाऊ आहेत. मोठा बाहुबली हा तसा सद्वर्तनी, तर धाकटा भल्लालदेव हा वाट्टेल ते करून आपल्याला हवं ते पदरात पाडून घेणारा. त्यांची आयेश्री सरळमार्गी, प्रामाणिकपणाची पुरस्कर्ती. तर बाबाश्री लफंडू. हवा वाहेल तशी पाठ फिरवणारा. दोघा भावांत राजेपदी कुणी बसायचं, यावरून सुरू झालेल्या भांडणात आयेश्री आणि बाबाश्री यांच्यात आपण कुणाची बाजू घ्यायची यावरून चांगलीच जुंपते. आयेश्री मोठय़ाच्या बाजूने, तर बाबाश्री धाकटय़ाच्या. पण थोरल्या बाहुबलीचं देवसेनेशी लग्न होतं आणि सारंच उलटंपालटं होतं. देवसेना बाहुबलीला आपल्या तालावर नाचवते. भल्लालदेवाला पराभूत करण्यासाठी खोटय़ानाटय़ाचा आधार घेण्यात देवसेनेला काही गैर वाटत नाही. सुनेच्या या आपमतलबी स्वभावामुळे आयेश्री बाहुबलीचा पक्ष सोडून धाकटय़ाला जाऊन मिळते. दोन भावांपैकी राज्याचा वारसदार कोण, हे ठरवण्यासाठी क्रिकेटची मॅच घेतली जाते. त्यात देवसेना चापलुसगिरी करून धाकटय़ा दीराला पराभूत करते. त्यामुळे त्याला राज्यत्याग करून शेती करण्यासाठी आयेश्री आणि बाबाश्रीसह घराबाहेर पडावे लागते.

एकेकाळी राजवैभव भोगलेल्या या मंडळींना शेती करणं किती कष्टाचं आणि जिकिरीचं काम आहे, शेतीत केवळ दु:ख आणि दारिद्य््राच कसं पाचवीला पूजलं आहे याची रोकडी प्रचीती येते. शेतकऱ्याच्या वेदना त्यांना समजतात. पण व्यवस्थेकडून त्यांना न्याय मिळत नाही, हेही कळून चुकतं.

लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना मनोरंजनाच्या पुडीतून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘यदा कदाचित रिटर्न्‍स’मध्ये केलेला आहे. यासंबंधातला क्लायमॅक्सचा प्रसंग प्रेक्षकांवर थोडाफार परिणाम करतो खरा; परंतु त्यातून अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. कारण त्याआधीचं संपूर्ण नाटक वेगळ्याच ट्रॅकवरून हाताळलं गेलं आहे. लोककला हे संतोष पवारांचं होम पीच. त्यांची अख्खी कारकीर्द त्यावर आधारली आहे. शाहीर साबळेंच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’मध्ये प्राप्त झालेलं संचित संतोष पवार यांनी जितक्या सढळपणे आपल्या नाटकांतून वापरलेलं आहे तसं दुसऱ्या कुणालाच ते जमलेलं नाही. अगदी शाहीर साबळेंच्या नातवाला- केदार शिंदे यांनादेखील! त्यातला तोच तोपणा गृहीत धरूनही पवार यांनी लोककलांचा वापर मनोरंजनासाठी चपखलपणे वेळोवेळी करून घेतला, हे मान्यच करायला हवं. इथंही सुरुवातीला नमन वगैरे सोपस्कार त्यांनी परंपरेनं पार पाडले आहेत. त्यानंतर मात्र त्यांनी पुढचं नाटय़ आपल्या नेहमीच्या हुकमी पद्धतीनं सादर केलं आहे. तब्बल सोळा पात्रांची ही सुनियंत्रित सर्कस अर्थात तेच करू जाणोत. सैल बांधणीच्या या नाटकात प्रेक्षकांना कंटाळ्याला मोकळं सोडायचं नाही, हे तत्त्व संतोष पवार यांनी कटाक्षानं पाळलं आहे. अमुक एक पात्र नाटकात कशासाठी, हे विचारायची सोय पवारांच्या नाटकात नसतेच. ‘पवार यांना हवंय म्हणून!’ हेच त्याचं खरं उत्तर! त्यामुळे निरनिराळ्या काळांतली चित्रविचित्र पात्रं ‘यदा कदाचित रिटर्न्‍स’मध्येही गुण्यागोविंदानं नांदतात. प्रेक्षकांचं आपल्या परीनं मनोरंजन करतात. रंजनाच्या या मात्रेचं प्रमाण योग्य की अयोग्य, हे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ज्यानं त्यानं ठरवावं. कुणाला ते कदाचित थिल्लर वाटेल. कुणाला त्यावर गडगडाटी हसू येईल. कुणी चार घटका मजेत गेल्यानं समाधान पावतील. तर या सगळ्या शक्यता ध्यानी घेऊनच प्रेक्षकांनी नाटकाला जावं. इतक्या वर्षांच्या वाटचालीत संतोष पवारांचा म्हणून एक प्रेक्षक तयार झालेला आहे. त्यांना पवार यांची नाटकं जाम आवडतात. याचं कारण ‘वलयां’कित सोडाच; परंतु रूढार्थानं अभिनेत्याला आवश्यक ‘चेहरा’ नसलेल्या कलाकारांकडून सवरेत्कृष्ट काम करवून घेण्यात संतोष पवार यांचा हातखंडा आहे. आज मनोरंजनाच्या दुनियेत नावारूपाला आलेले अनेक कलावंत संतोष पवारांच्या नाटकाच्या मांडवाखालून जात मोठे झाले आहेत. ‘यदा कदाचित रिटर्न्‍स’मध्येही असेच बिनचेहऱ्याचे कलावंत आहेत. परंतु या सर्व कलाकारांनी सर्वस्व झोकून कामं केली आहेत. त्यातही विशेषत्वानं उल्लेख करायला हवा तो ऋषिकेश शिंदे (बाबाश्री), शर्वरी गायकवाड (देवसेना), प्रदीप वेलोंडे (भल्लालदेव), अविनाश थोरात (आगंतुक), रविना भायदे (आयेश्री), नरेश वाघमारे (कटप्पा), स्नेहल महाडिक (शांताबाई) यांचा! नाटकाच्या तांत्रिक बाजू पवारांच्या नाटकांत त्यांना हव्या तशा चोख असतातच.