बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा बाला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तारुण्यावस्थेत केसगळतीमुळे त्रस्त असलेल्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ६१. ७३ कोटी रुपयांची कमाई केली असून यामीने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना विशेष भावत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने यामीला काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातच तू टक्कल असलेल्या व्यक्तीशी लग्न करणार असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता, त्यावर तिने जे उत्तर दिलं ते ऐकून अनेकांचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं.

“एखाद्या टक्कल असलेल्या व्यक्तीला तू लाइफ पार्टनर म्हणून निवडशील का? असा प्रश्न यामीला विचारण्यात आला होता. यावर यामीने भन्नाट उत्तर दिलं. टक्कल असणं ही काही चूक नाही. जर माझ्या आयुष्यात असा व्यक्ती आला तर मला काही हरकत नाही आणि मी लग्न करणार असलेल्या व्यक्तीला टक्कल असेल तर मला अजिबातच काही वाटणार नाही”, असं यामी म्हणाली.

वाचा : …म्हणून लता मंगेशकर यांनी पद्मिनी कोल्हापूरेंना दिल्या शुभेच्छा

पुढे ती म्हणते, “टक्कल असलेले व्यक्ती मला जास्त कूल वाटतात. ते खरंच जास्त कूल वाटतात. प्रत्येक व्यक्तीने स्वत:वर प्रेम करावं हाच बाला या चित्रपटाचा उद्देश होता. जर तुम्ही स्वत: वर प्रेम करायला लागलात तर जगात कोणत्याही व्यक्तीवर तुम्ही सहज प्रेम करु शकतात”.

दरम्यान, बालाला चित्रपटगृहांमध्ये मिळत असलेला प्रतिसाद पाहून यामी प्रचंड खूश आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं आहे. तसंच या चित्रपटामध्ये आयुषमान खुराणा, भूमी पेडणेकर, यामी गौतम, सौरभ शुक्ला, सीमा पहावा, जावेद जाफरी, अभिषेक बॅनर्जी, धीरेंद्र कुमार ही कलाकार मंडळी झळकली आहे.