बॉलीवूडमध्ये सोनम कपूर, करिना कपूर, कतरिना कैफ त्यांच्या स्टाईलिश अवतारांसाठी ओळखल्या जातात. बॉलीवूडच्या या तारका त्यांच्या रेड कार्पेट लूकसाठी आणि खास स्टाईल स्टेटमेंटसाठी नेहमीच चर्चेत असतात. पण आता लवकरच या यादीत एक नवीन नाव सामील होऊ पाहत आहे. या तारकेचे नाव आहे यामी गौतम! यामीने आतापर्यंत तिच्या लूकसाठी आणि स्टाईलसाठी नेहमीच फॅशन समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. तरीही अजूनही ती स्टाईल आयकॉनच्या शर्यतीत भाग घेऊ शकली नव्हती. पण आता तर ती या तारकांच्याही एक पाऊल पुढे जाणार आहे. ऑनलाइन मार्केटिंगमधील देशातील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘जबाँग डॉट कॉम’ने नुकतेच यामीला त्यांच्या ‘इंडियन ऑनलाइन फॅशन वीक’साठी करारबद्ध केले आहे. या फॅशन वीकसाठी यामी प्रथमच एका परीक्षकाच्या भूमिकेतून चाहत्यांसमोर येणार आहे.
‘इंडियन ऑनलाइन फॅशन वीक’च्या निमित्ताने जबाँगने पहिल्यांदाच देशात ऑनलाइन फॅशन वीकचा उपक्रम हाती घेतला आहे. या फॅशन वीकच्या माध्यमातून फॅशन क्षेत्रातील काही नवे चेहरे शोधण्याचा प्रयत्न कंपनीतर्फे  करण्यात येणार आहे. यासाठी देशभरातून डिझाइनर्स, मॉडेल्स, फोटोग्राफर्स आणि मेकअप आर्टिस्ट्ससाठी प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. त्यातील निवडक डिझाइनर्सच्या कलेक्शनचा समावेश या फॅशन वीकमध्ये करण्यात येणार आहे.या मधील मॉडेल्सच्या निवड प्रक्रियेमध्ये यामी एक मार्गदर्शक आणि परीक्षक म्हणून काम पाहणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मॉडेल्सना ती ग्रूमिंगचे धडे देणार आहे.
या फॅशन वीकच्या निमित्ताने मला फॅशन आणि स्टाइल विषयावर तरुणांसोबत संवाद साधण्याची संधी मिळेल त्यामुळे मी या उपक्रमात सहभागी झाले, असे यामीने सांगितले. तसेच अशा उपक्रमांमुळे भारतीय फॅशन जगताला एक नवीन दिशा मिळण्यास मदत होऊ शकेल, असे मत तिने व्यक्त केले.
‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या यामीच्या खात्यात आतापर्यंत केवळ दोनच चित्रपट जमा आहेत. जाहिरात क्षेत्रात एक मॉडेल म्हणून तिने बरेच नाव कमावले आहे आणि आता यनिमित्ताने ग्रूमिंग क्षेत्रातील मार्गदर्शकाच्या भूमिकेत तिला पाहण्याची आणि तिच्याकडून खास ग्रूमिंग टिप्स मिळवण्याची संधी यामीच्या चाहत्यांना मिळणार आहे.