|| भक्ती परब

दिग्दर्शक म्हणून पहिल्याच ‘रिंगण’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या मकरंद माने यांचा दुसरा चित्रपट कोणता असेल, कसा असेल, याबाबत प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे. चौकटीबाहेरचे चित्रपट करण्यावर भर असणाऱ्या मकरंदने या वेळीही ‘यंग्राड’च्या निमित्ताने शाळकरी मुलांच्या मैत्रीची कथा मांडली आहे. या वेळीही त्याने नवीन कलाकारांना घेऊनच ही कथा रंगवली आहे. अभिनेता शरद केळकर आणि शशांक शेंडे हे दोन ओळखीचे चेहरे सोडले तर नव्या तरुण कलाकारांना घेऊन केलेला ‘यंग्राड’ एक वेगळा संदेश देऊन जातो, असे मकरंदने स्पष्ट केले. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हिंदीतील ‘फँटम प्रॉडक्शन’ मराठी चित्रपटनिर्मितीत उतरले असल्याने या चित्रपटाबद्दलच्या उत्सुकतेत भर पडली आहे.

‘रिंगण’ चित्रपटानंतर मी विविध विषयांवर विचार करत होतो की काय करायचं आहे नेमकं? मग माझ्याच आयुष्यात घडलेल्या गोष्टींचा मी विचार करू लागलो. मी त्या वयात दहावीनंतर घर सोडलं होतं, काही महत्त्वाचे निर्णय घेताना वडिलांशी बोललो होतो. मी घराबाहेर पडलो नसतो तर इथपर्यंत आलो नसतो, पण आता असं दिसतंय की, मुलं आणि पालकांमधला संवाद खुंटलाय. ते एकमेकांना गृहीत धरतात. एकमेकांचं ऐकत नाहीत, एकमेकांशी नीट बोलत नाहीत. माझ्या अनुभवातून हे लक्षात आलं की, माझा जर त्या वेळी घरच्यांशी नीट संवाद झाला नसता, तर मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. त्यामुळे मुलांच्या दृष्टिकोनातून या विषयाला हात घालण्याची गरज वाटू लागली आणि ‘यंग्राड’ आकाराला आलं, असं मकरंद सांगतो.

‘यंग्राड’ ही कुमारवयीन मुलांची गोष्ट आहे. आयुष्यात नेमकं काय करायचं आहे? समोर दिसणाऱ्या गोष्टींपैकी आपल्याला कुठल्या बाजूला जायचं आहे? या निर्णयातला त्यांचा गोंधळ, त्यामागची कारणं आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांतून होणारे परिणाम यावर चित्रपटाची गोष्ट बेतली असल्याचं मकरंदने स्पष्ट केलं.

‘नाशिकमध्ये बिघडलेल्या मुलांना उद्देशून ‘यंग्राड’ हा शब्द वापरला जातो. यंग आणि राडा या दोन शब्दांनी मिळून तो शब्द प्रचलित झालाय. यात काही प्रमाणात नाशिकची बोली आहे, लहेजा आहे; पण इतर बोलींपेक्षा ती फार वेगळी नाहीय. ती समजायला सोपी आहे. या चित्रपटातील कथेच्या अनुषंगाने आम्ही नाशिकमधीलच कलाकार निवडले आहेत आणि चित्रीकरणही तिथे केलं आहे,’ असं त्याने सांगितलं. नाशिक हे  गंगाघाटावर वसलेलं शहर आहे. घाटाचा परिसर, तिथे बाहेरून येणारे लोक याचा परिणाम मूळ नाशिकमध्ये राहणाऱ्या लोकांवरती होतो. या सगळ्याचा वापर चित्रपटासाठी करण्यात आला असल्याचे त्याने सांगितले.

मुळात कथालेखन करतानाच पात्रं कशी असतील याचा विचार तो करतो, त्यामुळे त्यानुसार चेहरे शोधणं महत्त्वाचं असतं. नवे चेहरे की मुरलेले कलाकार असा भेदच राहत नाही. त्यामुळे भूमिकेला न्याय देऊ  शकतील असेच कलाकार निवडल्याचं मकरंद सांगतो. ‘नाशिकमध्ये ८०० ते १००० मुलांची ऑडिशन घेतली. एक महिना कार्यशाळा घेतली. त्यातून मुलांची निवड केली. सेटवर एकदम उत्साहाचं वातावरण होतं. सगळे कलाकार शूटिंगदरम्यान अक्षरश: नाशिकमध्ये रमले होते. अभिनेता शरद केळकरची यात महत्त्वाची भूमिका आहे. आम्हाला एक वेगळाच पण हिंदीतला वाटेल असा कलाकार हवा होता. जेलमधलं एक दृश्य होतं, त्याच्यासाठी अशी व्यक्ती पाहिजे होती जी त्यात वेगळी वाटेल. इथे शरद विक्या नावाच्या मुलाचे मार्गदर्शक म्हणून चित्रपटात येतो,’ असे त्याने सांगितले. या चित्रपटाची पटकथा मकरंद, शशांक शेंडे आणि अझीझ मदारी यांनी मिळून लिहिली आहे, तर संवाद भूषण पाटील यांनी लिहिलेत.

‘यंग्राड’वर मक रंदची गाडी थांबलेली नाही. त्याच्या ‘कागर’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालंय. त्याचं पोस्ट प्रॉडक्शन सुरू आहे. ‘मजा येईल करायला असा एखादा विषय हाताळायचा आहे. मला गोष्टींवर काम करायला खूप आवडतं,’ असं मकरंद सांगतो. या चित्रपटाची अजून एक महत्त्वाची बाजू म्हणजे ‘फॅन्टम’ यात निर्माता म्हणून आमच्यासोबत आहेत. कारण त्यांना आशय जास्त महत्त्वाचा वाटतो. त्यासाठीचे त्यांचे निकष असतात. चांगला आशय आणि व्यावसायिकतेची जोड फॅन्टममुळे ‘यंग्राड’ला मिळाल्याबद्दल त्याने समाधान व्यक्त के ले. ‘मधू मंटेना आणि अनुराग कश्यप यांनीही हा चित्रपट पाहिला. त्यांचाही प्रतिसाद चांगला होता. एकूणच फॅन्टमच्या टीमला हा चित्रपट आवडला होता. त्यामुळे ते निर्माते म्हणून आमच्यासोबत आले. या चित्रपटातून मी आजची परिस्थिती मांडतोय. या चित्रपटादरम्यान एक घटना अशी घडली की, आम्ही एका गल्लीत चित्रीकरण करत होतो. अचानक आरडाओरडा ऐकू आला. तिथे पाहिलं की, एका मुलाने गळफास लावून आत्महत्या केली होती. हा आमच्यासाठी मोठा धक्का होता. कारण तेच होतं की, पालकांचं आणि मुलांचं पटत नव्हतं. एका छोटय़ाशा भांडणामुळे त्याने आत्महत्या केली होती. मुलांच्या मानसिकता काय आहेत, याचा विचार करून आम्ही लिहीत होतो; पण कथेतून जे सांगू पाहतोय ते आमच्यासमोर घडत होतं. त्यामुळे आपण जे करतोय ते बरोबर आहे याची अधिक खात्री पटली आहे. मुलांनी कुठेही अहंकार आड न आणता आईवडिलांशी मोकळा संवाद साधला पाहिजे, हा विचार आज तरुणांपर्यंत पोहोचायलाच हवा आहे. तेच काम मी या चित्रपटाच्या माध्यमातून करतो आहे,’ असे मकरंद आवर्जून सांगतो.

मुलं १६-१७ वर्षांची झाली की त्यांना मित्र जवळचे वाटतात. खरं तर पालकही त्यांच्या जवळच असतात, पण त्यांच्यापेक्षा मित्रांना जास्त महत्त्व दिलं जातं. आपलं आणि मित्रांचं वय लहान आहे, ते आपल्याला सल्ला देऊ शकत नाहीत, दिला तरी त्यांचा सल्ला चुकीचा असण्याची शक्यता जास्त असते हेच मुलं या वयात लक्षात घेत नाही आणि त्यात जर पालकांबरोबर संवादाचा अभाव असेल तर त्याची भरच पडते. ‘यंग्राड’मध्ये अशाच मुलांची गोष्ट आहे.    – मकरंद माने

यंग वयात जे राडा करतात त्यांची गोष्ट म्हणजे ‘यंग्राड’. हे वय नाजूक असतं. चार मुलांच्या आयुष्यात काय घडतं, त्यांचा दंगा, मस्ती, राडा, प्रेम सगळं यात आहे. हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे, कारण कुटुंबाने आपल्या मुलांसोबत कसं वागलं पाहिजे याबद्दल खूप सुंदर मांडणी या चित्रपटात आहे. त्याचबरोबर मनोरंजनही पुरेपूर आहे. शहर असो वा गाव, आजच्या काळात असा चित्रपट मुलांनी बघायला हवा. सगळ्यांसाठी काही ना काही आहे यात. माझ्या भूमिकेला नाव नाही आहे, पण त्याला सगळे ‘सेनापती’ असं म्हणतात. तो हिंदीत बोलतो. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा, पण अनुभवी माणूस असतो. तो तुरुंगामध्ये विक्या नावाच्या पात्राला मार्गदर्शन करतो. त्याला पुढे आयुष्यात काय करायचं हे सांगतो. आडनिडय़ा वयातील मुलांना कसं वागायचं हे तो सांगतो, अशी ही मस्त भूमिका आहे. मित्रांबद्दल आहे आणि मित्रांनी मिळून साकार केलेला हा चित्रपट आहे.     – शरद केळकर