05 March 2021

News Flash

‘परंपरा आणि नावीन्य दोन्ही जपणं हीच यश चोप्रांची खासियत’

यश चोप्रा यांची खासियत थक्क करून गेल्याचं रेहमान सांगतात....

प्रेमपटांचा बादशहा म्हणून ओळखले गेलेले दिग्दर्शक यश चोप्रा आणि आपल्या संगीताने जगभरातील लोकांना वेड लावणारा संगीतकार ए. आर. रेहमान ही जोडी आठ वर्षांपूर्वी ‘जब तक है जान’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले होते. यश चोप्रा यांचा दिग्दर्शक म्हणून कारकीर्दीतील तो अखेरचा चित्रपट होता. या चित्रपटाच्या निमित्ताने सर्वोत्तम ते जमवण्याचा अट्टहास केला गेला. या अट्टहासातून आणखी एक किमयागार या दोघांशी जोडला गेला होता, ते म्हणजे गुलजार साहेब. गुलजार यांचे शब्द, रेहमान यांचे संगीत आणि यश चोप्रांचा प्रेमपट हे रसायन खुद्द आपल्यासाठीही अविस्मरणीय असेच होते, अशी कबुली रेहमान यांनी दिली आहे. ‘जब तक है जान’ या चित्रपटाला आठ र्वष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जागवलेल्या आठवणीत रेहमान यांनी सांगितले की, या दोन दिग्गजांबरोबर काम करण्याचा अनुभव अफलातून होता. आपल्या चित्रपटातून एकाच वेळी परंपरा जपणं आणि नावीन्यपूर्ण कल्पनाही साकारायच्या ही यश चोप्रा यांची खासियत थक्क करून गेल्याचं रेहमान सांगतात.

‘जब तक है जान’ या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून आपली निवड कशी झाली असेल, याबद्दलही रेहमान यांनी मोकळेपणाने सांगितलं आहे. यशराज यांचे सगळे चित्रपट पाहिले आणि दुसरीकडे एक संगीतकार म्हणून मी यशराजच्या चित्रपटांना वेगळं काय देऊ शकतो, याचा विचार केला गेला. त्याचा फायदा खुद्द रेहमान यांनाही झाल्याचं ते सांगतात. मी स्वत:ही त्याच प्रक्रियेतून गेलो. चित्रपटाचा विषयही माझा आवडता होता, त्यामुळे त्या प्रवाहात झोकून देऊन काम करणं सोपं गेलं, असं ते सांगतात. या चित्रपटाची संगीतनिर्मिती मुंबईतच झाल्याचं त्यांनी सांगितलं. कधी माझ्या स्टुडिओत.. तर कधी त्यांच्या स्टुडिओत.. असे करत आम्ही काम पूर्ण के लं. यश चोप्रा कधीही इतर कोणाच्या स्टुडिओत जात नाहीत, हे मी ऐकून होतो. मात्र माझ्या स्टुडिओत ते प्रेमाने आले. त्यांच्याबरोबर गुलजार साहेबही होते. आम्ही तिघांनी एकत्रित काम केलं असल्याने ही संगीतनिर्मिती माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, असे रेहमान सांगतात. या चित्रपटाच्या संगीताला गुलजार यांच्या द्रष्टेपणाची किनारही लाभली होती, असं ते म्हणतात. तुम्ही गुलजार यांच्याबरोबर काम करता तेव्हा तुम्ही अनुभवाल की ते कायम कवितेत रमलेले असतात. त्यांची देहबोली, त्यांची वाणी, डोळ्यांत प्रेम आणि त्यांचे ज्ञान हे सगळं अनुभवणं समृद्ध करणारं असतं. आम्ही तिघांनी रमझानचे उपासही एकत्र केले होते, अशी आठवणही रेहमान यांनी सांगितली. रेहमान यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांबद्दल यश चोप्रा यांच्या मनात एक खास स्थान होतं. या चित्रपटातील ‘हीर हीर’ हे गाणं आपल्या आवडीचं असल्याचं रेहमान सांगतात. या गाण्याशी यश चोप्रा यांची आणखी एक आठवण जोडली असल्याचंही ते सांगतात.

‘हीर हीर’ हे एकच गाणं असं होतं जे करताना मला माझ्या मनासारखं करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. ३० सेकंदांचं हे गाणं होतं. या गाण्याचं ध्वनिमुद्रण ऐकल्यानंतर तू पंजाबी नाहीस, तरीही गाण्यात पंजाबी लेहेजा अचूक कसा पकडतोस, असा प्रश्न त्यांनी मला विचारला होता. संगीताला भाषेची गरज नसते. पंजाबी गाण्याचं संयोजन करण्यासाठी मला पंजाबमध्ये राहायची गरज नाही. आपल्या देशात आपण परस्परांशी घट्ट जोडले गेलेलो आहोत. आपल्या परंपरा परस्परांशी निगडित आहेत आणि आपण एकमेकांचा, एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतो. त्यामुळे गाण्यातही त्याचे तरंग उमटतातच, पण त्यात साचेबद्धता नसते, साचलेपणा नसतो,’ असे रेहमान यांनी त्यांना सांगितले. अर्थात ही आठवण सांगतानाच यश चोप्रा यांचा परंपरेला जपण्याचा आग्रह आणि त्याच वेळी नवीन कल्पनांची निवड करणं, त्यांना प्राधान्य देणं या दोघांचा समतोल साधणं हे त्यांना चांगलं जमायचं, अशा शब्दांत दिग्दर्शक म्हणून त्यांचं हे कौशल्य किती अफलातून होतं हेही रेहमान यांनी सांगितलं. इतका मोठा दिग्दर्शक असूनही एखाद्या लहान मुलाच्या उत्साहात सगळ्या गोष्टी करण्याचा, समजून घेण्याचा त्यांचा स्वभाव आपल्याला भुरळ पाडून गेला, असंही रेहमान यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 2:36 am

Web Title: yash chopra a r rahman jab tak hai jaan mppg 94
Next Stories
1 छोटय़ांवर मोठी मदार
2 Video : ‘हे अत्यंत वेदनादायी’; सुशांतशिवाय परफॉर्म करताना अंकिता भावूक
3 ‘धर्मांतराला विरोध केल्याने आमचं नातं संपुष्टात आलं’; दिवंगत वाजिद खानच्या पत्नीचा खुलासा
Just Now!
X